दहा हजार क्रीडाप्रेमी खेळाडूंमधील चुरस बघतील! टोकियो ऑलिम्पिकसाठी देण्यात आली परवानगी

अखेर टोकियो ऑलिम्पिकमधील खेळाडूंमधील चुरस पाहण्याची संधी 10 हजार प्रेक्षकांना मिळणार आहे. टोकियो ऑलिम्पिकचे आयोजक, जपान व टोकियो सरकारमधील पदाधिकारी, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती व आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समिती यांच्यामधील पाचस्तरीय बैठकीनंतर सोमवारी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

पॅरालिम्पिकबाबत निर्णय 16 जुलैला

आयोजकांकडून या वेळी सांगण्यात आले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रेक्षकांच्या इव्हेण्टसाठी जपान सरकारकडून कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे टोकियो ऑलिम्पिकसाठी स्टेडियमच्या मर्यादेपेक्षा अर्धे अर्थातच 10 हजार प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच पॅरालिम्पिकसाठी किती टक्के प्रेक्षकांना परवानगी द्यायला हवी याबाबतचा निर्णय 16 जुलै रोजी घेण्यात येणार आहे, असेही त्यांच्याकडून पुढे सांगण्यात आले.

…तर प्रेक्षकांविना होणार क्रीडा महोत्सव

जपानमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर टोकियो ऑलिम्पिकमधील स्टेडियममध्ये प्रेक्षकांना नो एण्ट्री करण्यात येईल. बंद स्टेडियममध्ये क्रीडा महोत्सवातील क्रीडा शर्यती पार पाडल्या जातील. हा पर्यायही आम्ही डोळ्यांसमोर ठेवला आहे, असे आयोजकांकडून पुढे स्पष्ट करण्यात आले.

ऑलिम्पिक गावातील सर्वांचेच लसीकरण

टोकियो ऑलिम्पिकसाठी खेळाडू व जनतेसाठी कडक नियम तयार करण्यात आले आहेत. या वेळी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे प्रमुख थॉमस बाक म्हणाले, ऑलिम्पिक गावात वास्तव्यास असलेल्या 80 टक्क्यांहून अधिक लोकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. खेळाडूंना इतर कोणाचाही संपर्क होऊ देणार नाही. तसेच त्यांची दररोज कोरोना चाचणीही करण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या