कोरोना ग्रामीण भागात फैलावल्यास स्थिती अधिक बिकट होईल; WHO चा इशारा

1011

कोरोनाचा विळखा जगभरात वाढत आहे. हिंदुस्थानातही कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. हिंदुस्थानच्या ग्रामीण भागातही कोरोना फैलावण्यास सुरुवात झाली आहे. ग्रामीण भागात फैलावणारा कोरोनाला वेळीच आळा घातला नाही तर ग्रामीण भागातील परिस्थिती अधिक बिकट आणि भयानक होण्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) दिला आहे. ग्रामीण भागात मर्यादित आरोग्य सुविधा आहे. त्यांच्या मदतीनेच हिंदुस्थानाला कोरोनावर मात करावी लागेल, असेही डब्लूएचओने स्पष्ट केले आहे.

ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी स्थानिक पातळीवरच प्रयत्न होणे गरजेचे आहे. तसेच त्यात स्थानिकांचे सहकार्यही महत्त्वाचे आहे. सोशल डिस्टन्सिंग, हँडवॉश आणि मास्क या तीन गोष्टींचा वापर केल्यास कोरोना रोखण्यात यश येईल असा विश्वास डॉ. राजकुमार यांनी व्यक्त केला आहे. ते कोविड सेंटरमध्ये रुग्णांवर उपचार करतात. कोरोना रोखण्यासाठी हे तीन उपाय प्रभावी ठरतील असे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच आहारातही विटामिन सी जास्त प्रमाणात असेल असे पदार्थ घ्यावे, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

ग्रामीण भागातील फैलाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेसमोर अनेक आव्हाने आहेत. मर्यादीत साधने आणि सुविधांची कमतरता ही प्रमुख समस्या आहे. या परिस्थितीशी जुळवून घेत आपल्याला या संकटाचा सामना करावा लागेल. कोरोनाच्या माहितीसाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, ग्रामीण भागात त्याबाबतची माहिती नाही. कोरोनाच्या जनजागृतीसाठी ग्रामीण भागात व्यापक प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच ग्रामीण भागात ऑक्सीमीटर पुरवल्यास अनेकजण स्वतःच्या आरोग्याची प्राथमिक तपासणी करून घेऊ शकतील. आता ग्रामीण भागातही कोरोना तपासणीची क्षमता वाढत आहे, ही सकारात्मक बाब असल्याचे त्यांनी सांगितले. सोशल डिस्टन्सिंग, हँडवॉश आणि मास्क या तीन गोष्टीच कोरोनापासून आपला बचाव करू शकतात, असे डॉ. राजकुमार यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या