
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशातील काही राज्यांमध्ये अंशतः तर काही ठिकाणी संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले आहे. शास्त्रज्ञ विज्ञानाच्या मदतीने महामारीला रोखण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत आहेत, मात्र तामीळनाडूतील कोईम्बतूर येथून अजबच प्रकार समोर आला आहे. कोरोना महामारीपासून बचावासाठी येथे चक्क कोरोना देवीची स्थापना करण्यात आली आहे. यामुळे कोरोनाचा धोका कमी होईल, असा दावा करण्यात आला आहे.
कोरोना महामारीपासून बचावासाठी सध्या तरी कोरोना निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करणे, लसीकरण यासारखेच पर्याय समोर आहेत. पण काही लोक श्रद्धेचा मार्ग अवलंबत कोरोनाला पळवून लावण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. देशाच्या काही भागांत कोरोना देवीची स्थापना करून पूजाअर्चा सुरू असल्याचे प्रकार समोर येत आहेत. कोईम्बतूर भागातील इरुगुरमधील कमाचीपुरी आदिनाम मंदिराने थेट कोरोना देवीची मूर्ती तयार करून तिची स्थापना केली आहे. या देवीची पूजा केल्यास कोरोना संसर्गापासून बचाव होऊ शकेल, असा दावा मंदिर प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
कॉलरा आणि प्लेग यांसारख्या आजारांपासून बचाव करण्यासाठी यापूर्वी देवीची स्थापना करून पूजा करण्यात आली होती. लोकांना आजारांपासून वाचवण्याची ही परंपरा असल्याची माहिती आदिनाम मंदिरातील व्यवस्थापक सिवालिनेजेश्वर यांनी दिली.
विशेष पूजा आणि प्रार्थना
कोईम्बतूर येथील आदिनाम मंदिरात ब्लॅक ग्रेनाईटपासून दीड फूट उंचीची कोरोना देवीची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. या ठिकाणी कोरोनासाठी विशेष पूजा आणि प्रार्थनाही केली जाणार असून 48 दिवसांचा महायज्ञ करण्यात येणार आहे. महायज्ञ पूर्ण झाल्यानंतरच सामान्य नागरिक कोरोना देवीचे दर्शन घेऊ शकतील, असे प्रशासनाकडून सांगितले जात आहे.



























































