कोरोनामुळे रुग्णाचा झाला होता मृत्यू, तेराव्यापूर्वीच पोहोचला घरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
file photo

पश्चिम बंगालमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. एका 75 वर्षीय रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. रुग्णाच्या कुटुंबीयांनी त्यांचे अंत्यसंस्कारही केले होते. पण तेराव्याच्या आदल्या दिवशी हा रुग्ण ठणठणीत बरा होऊन घरी परतला. यामुळे कुटुंबीयांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला पण आपण कुणावर अंत्यसंस्कार केले असा प्रश्नही त्यांना पडला.

मिळालेल्या माहितीनुसार 75 वर्षीय शिवदास बंदोपाध्याय यांना कोरोनाची लागण झाली होती. 11 नोव्हेंबर रोजी त्यांना रुग्णालयात दाखलही करण्यात आले होते. नंतर बंदोपाध्याय यांच्या कुटुंबीयांना सांगण्यात आले की शिवदास यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे बंडोपाध्याय यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. रुग्णालयाने बंडोपाध्याय यांचा मृतदेह एका प्लॅस्टिकच्या बॅगेत त्यांच्या कुटुंबीयांना सुपुर्द केला. कोरोना प्रॉटोकॉलनुसार त्यांचा चेहराही कुटुंबीयांना पाहता आला नाही. कुटुंबीयांनी त्यांचे अंत्यसंस्कार केले आणि तेराव्याच्या तयारीला लागले.

त्यापूर्वी घरातील एका सदस्याला फोन आला की बंडोपाध्याय बरे झाले आहेत आणि त्यांना सोडण्यासाठी रुग्णवाहिकेची सोय करण्यात आली आहे. तेव्हा कुटुंबीयांना आश्चर्याचा धक्का बसला. तसेच बंडोपाध्याय यांना पाहून कुटुंबीय खूष झाले. पण आपण अंत्यसंस्कार झालेला मृतदेह कुणाचा होता असा प्रश्न त्यांना पडला.

तेव्हा वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले की, 13 नोव्हेंबर रोजी मोहिनमोहन मुखोपाध्याय या वृद्ध रुग्णचा मृत्यू झाला होता. त्यांचा मृतदेह चुकून बंडोपाध्याय कुटुंबीयांकडे पाठवण्यात आला. बंडोपाध्याय कुटुंबीयानी मुखोपाध्याय यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्याचे समोर आले.