कोरोना नाही पण कापसातले किडे चावतात, बीड जिल्ह्यात कापूस खरेदी ठप्पच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घराघरात पसरलेले कापसाचे ढिगारे शेतकऱ्याची झोप उडवत आहेत. आगीची भीती, तोंडावर असणारा पावसाळा, माल असून खिशात दमडी नाही,  खरेदी केंद्रावर घेऊन गेलेला कापूस परत आणावा लागत आहे, कापूस खरेदी केंद्र अद्याप ही सुरूं नाहींत, घरात पडलेल्या कापसाच्या ढिगाऱ्यातील सरकीचे किडे चावून आरोग्य धोक्यात येत आहे अशी बिकट अवस्था बीड जिल्ह्यातील शेतकऱ्याची झाली आहे.

बीड जिल्ह्यातील शेतकरी अत्यंत कठीण परिस्थिती मधून मार्गक्रमण करत आहे. आधी दुष्काळ, पुन्हा अवकाळी, आता कोरोनाचे संकट मानगुटीवर बसले आहे, गेल्या काही वर्षांपासून च्या दुष्काळाने कंबरडे मोडलेला शेतकरी आता उद्ध्वस्त होत आहे. पुढचा खरीप हंगाम महिनाभरावर येऊन ठेपला असताना गत हंगामातील कापूस पीक अजून विक्री झालेले नाही, घरात पडलेले कापसाचे ढिगारे शेतकऱ्याची झोप उडवत आहेत, बाहेर लॉकडाऊन मूळे दंडुके खाण्याची भीती अन घरात कापसाच्या ढिगाऱ्याने उठ बसी एवढी ही जागा शिल्लक नाही त्यात गेल्या चार महिन्यापासून घरात पडलेल्या कापसामुळे आता सरकीतील किडे चावत आहे, हा किडा चावला की अंगाला सूज येते, अशी अवस्था शेतकऱ्याची झाली आहे. कापसाचे पीक घरात पडून म्हणून खिशात दमडी नाही आर्थिक परिस्थिती हालकीची होत आहे, कापूस विक्री केंद्रावर घेऊन गेलेला कापूस केंद्र बंद असल्याने परत आणावा लागत आहे, ठराविक अंतर राखून कापूस खरेदी करावा, कापूस खरेदी केंद्र तातडीने सुरू करावीत, अशी मागणी शेतकरी करत आहेत.