Corona Effect: अनेक उद्योग संकटात; कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड!

कोरोनाचा फटका जगभरातील महत्त्वाच्या अर्थव्यवस्थांना बसला असून अनेक उद्योगधंदे अडचणीत आले आहेत. आता तीन आठवड्यांचा लॉक डाऊन घोषित करण्यात आल्याने अनेक उद्योगांच्या अडचणी वाढल्या आहेत. चीनकडून कच्चा माल येत नसल्याने अॅटो आणि या क्षेत्राशी संबधित उद्योगांचे उत्पादन ठप्प आहे. तर जागतिक बाजारपेठेतही मागणी नसल्याने उद्योग दुहेरी अडचणीत सापडले आहेत. अशा परिस्थितीत जमाखर्चाचा ताळमेळ बसवण्यासाठी काही उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात होण्याची शक्यता असल्याने अनेक कमगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यास 6 महिने लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर आर्थिक नुकसान झालेल्या उद्योगांना सावरण्यास आणखी सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे सुमारे वर्षभर उद्योगांना जमाखर्चाचा ताळमेळ सांभाळायचा आहे. काही कंपन्यांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वेच्छेने वेतनकपात स्वीकारली आहे. तर काही ठिकाणी कर्मचाऱ्यांना बिनपगारी रजा घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विमान कंपन्या, पर्यटन, रियल इस्टेट. ज्वेलरी, किरकोळ विक्री, वाहन उद्योगांना कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना वेतन कपातीचा सामना करावा लागेल, असे सूचित करीत या क्षेत्रातील अनेक कंपन्यांनी धोक्याचा इशारा दिला आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद असल्यामुळे परदेशी विमानकंपन्याही आर्थिक तोट्याचा सामना करत असून कर्मचारी कपात करणार नसल्याचे जाहीर केले आहे. मात्र, त्यांनी कर्मचाऱ्यांना बिनपगारी रजा घेण्याचे आवाहन केले आहे. उद्योग आर्थिक संकटाचा सामना करत असल्याने अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वच्छेने वेतनात 15 ते 20 टक्के कपात केली आहे.

देशभरात अनेक ठिकाणी गृहनिर्माण प्रकल्पाचे काम सुरू असतानाच लॉक डाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे रियल इस्टेट क्षेत्राचेही मोठे नुकसान झाले आहे. बांधकाम उद्योगावर आधारित असलेल्या मजुरांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे. तसेच अस्थिर अर्थव्यवस्थेमुळे सोन्याचांदीच्या दरातही चढउतार होत आहेत. त्यामुळे त्यांची मागणीही घटल्याने ज्वेलरी व्यवसायही अडचणीत आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या