कोरोनामुळे हिंदुस्थानच्या ऑलिम्पियन खेळाडूंची चिंता वाढली

कोरोना विषाणूमुळे यंदाचे टोकियो ऑलिम्पिक पुढल्या वर्षी आयोजित करण्याचा निर्णय आयोजकांकडून घेण्यात आला. यामुळे खेळाडूंना पदक मिळवण्यासाठी आणखी एका वर्षाची संधी मिळाली. मात्र याच कोरोनामुळे ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या हिंदुस्थानी खेळाडूंची चिंता वाढली आहे. आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद असल्यामुळे ज्या खेळांसाठी परदेशी प्रशिक्षकांची निवड करण्यात आली आहे, त्यांना सध्या तरी हिंदुस्थानात येता येणार नाही. त्यामुळ सुरूवातीचे काही दिवस हिंदुस्थानी खेळाडूंना स्वत: किंवा हिंदुस्थानी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सराव करावा लागणार आहे.

65 वर्षांवरील प्रशिक्षकांना शिबिरासाठी नो एण्ट्री
कोरोनानंतर परदेशी प्रशिक्षकांनी मायदेशी रवाना होण्याचा निर्णय घेतला. आता हिंदुस्थानात कोरोनाचा प्रभाव वाढत चाललाय. त्यामुळे काही परदेशी प्रशिक्षकांना सध्या तरी हिंदुस्थानात यायची इच्छा नाहीए. भरीसभर म्हणजे आंतरराष्ट्रीय विमानसेवांना अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. शिवाय विविध खेळांच्या राष्ट्रीय क्रीडा फेडरेशन्सकडून 65 किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या प्रशिक्षकांना सराव शिबीरासाठी नो एण्ट्री करण्यात आलेली आहे.

बॉक्सिंग, नेमबाजीमध्ये तीच परिस्थिती
आपल्या पत्नीला कर्करोग झाल्यामुळे हिंदुस्थानी महिला बॉक्सिंग संघाचे प्रमुख प्रशिक्षक रफाएल बेर्गामास्को हे इटलीला रवाना झाले आहेत. हाय परफॉमन्स संचालक सॅण्टीयागो निएका हेही आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी स्वीडन येथे गेले आहेत. नेमबाजीतील पिस्तोल या प्रकाराचे कोच पॅकेल स्मिरनोक यांचे वय 65 वर्षांच्या वर आहे. तसेच इनियो फाल्को यांनाही इटलीहून येथे येणे शक्य नाहीए. त्यामुळे हिंदुस्थानातील बॉक्सिंग व नेमबाजी या खेळांची परिस्थितीही सारखीच असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, हिंदुस्थानच्या 17 वर्षांखालील महिला फुटबॉल संघाचे स्वीडनमधील प्रशिक्षक थॉमस डेनरबाय व फिटनेस प्रशिक्षक पेर कार्लसन यांनीही मायदेशी प्रयाण केले आहे. त्यामुळे हिंदुस्थानात होणाऱया आगामी 17 वर्षांखालील फुटबॉल वर्ल्ड कपच्या तयारीवरही परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नीरज चोप्रा, शिवपाल सिंग यांचा सराव संकटात
ऍथलेटीक्समध्ये सातपैकी तीन प्रशिक्षकांचे वय 65 किंवा त्यापेक्षा जास्त आहे. यामध्ये गलीना बुखारीना (75), बेडरोस बेडरोसीयन (66) व युरी मीनाकोक (65) यांचा समावेश आहे. हिंदुस्थानातील सपोर्ट स्टाफच्या सहाय्याने खेळाडू परदेशी प्रशिक्षकांच्या सानिध्यात खेळांतील बारकावे आत्मसात करीत असतात. भालाफेकपटू नीरज चोप्रा व शिवपाल सिंग यांना डॉ. क्लॉस बार्तेनिएटझ यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करावा लागतो. पण ते सध्या जर्मनीत रवाना झाले आहेत. त्यामुळे या खेळाडूंचा सरावही संकटात सापडला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या