टी-20 मुंबई लीग स्थगित, वाढत्या कोरोनामुळे घेण्यात आला निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. महाराष्ट्रातही कोरोनाचा संसर्ग अद्याप कमी झालेला नाहीए. याच कारणामुळे मुंबईत खेळवण्यात येणारी टी-20 मुंबई लीग स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. टी-20 मुंबई लीगच्या गव्हर्निंग काऊन्सिलचे चेअरमन मिलिंद नार्वेकर व मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विजय पाटील यांनी संयुक्तपणे परिपत्रक काढून या निर्णयाबाबत कळवले आहे.

टी-20 मुंबई लीगच्या गव्हर्निंग काऊन्सिलचे चेअरमन मिलिंद नार्वेकर यांनी यावेळी सांगितले की, कोरोनाचा फटका हिंदुस्थानातील जनतेला बसला आहे. ऑक्सिजन व लसीची कमतरता जागोजागी दिसून येत आहे. अशा परिस्थितीत क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे सध्या स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे. आगामी काळात महाराष्ट्रातील परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेण्यात येईल, असेही मिलिंद नार्वेकर यावेळी म्हणाले.

लोकांचे प्राण वाचवायचे आहेत – मिलिंद नार्वेकर

सध्या कोरोनाचा कहर सुरू आहे. तमाम हिंदुस्थानीवासीयांसाठी हा कठीण काळ आहे. अशा परिस्थितीत क्रिकेट स्पर्धा घेण्याचा विचारही करू शकत नाही. आता सर्व मेहनत लोकांचे प्राण वाचवण्यासाठी करायला हवी, असेही मिलिंद नार्वेकर यांनी नमूद केले.