कोरोनाने आयपीएलच्या बायो‘बबल’चा फुगा फोडला

कोरोनाच्या दुसऱया लाटेने ‘आयपीएल’च्या बायो‘बबल’चा फुगा फोडला आहे. कोलकाता, चेन्नई या संघांतील दोघांना आणि नवी दिल्लीतील स्टेडियममधील ग्राऊंडस्मनना कोरोनाची लागण झाल्यामुळे आता या स्पर्धेच्या पुढील प्रवासावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कोरोनामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू व कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामध्ये सोमवारी होणारा सामनाही पुढे ढकलण्यात आला आहे. दुसरीकडे दिल्ली कॅपिटल या संघालाच क्वॉरंटाईन होण्याचे आदेश बीसीसीआयने दिले आहेत. क्वारंटाईनचा कालावधी किती असेल हे मात्र सांगितलेले नाही.

कोलकाता नाईट रायडर्ससह चेन्नई सुपरकिंग्स आणि नवी दिल्लीतील स्टेडियम येथेही कोरोनाचा शिरकाव झालेला आहे. चेन्नई सुपरकिंग्स संघाचे सीईओ काशी विश्वनाथन, गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी व बस क्लीनर यांचा रविवारचा रिपोर्ट पॉझीटीव्ह आला होता. पण सोमवारी या तिघांचा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. नवी दिल्ली स्टेडियममधील पाच ग्राऊंडस्मन यांचाही रिपोर्ट पॉझीटीव्ह आला आहे.

परदेशी क्रिकेटपटूंना धास्ती

ऍड्रय़ू टे, ऍडम झाम्पा, केन रिचर्डसन या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनी आयपीएल अर्धवट सोडून मायदेशात प्रयाण केले आहे. आता हिंदुस्थानातील वाढत्या कोरोनाचा धसका आयपीएलमध्ये सहभागी होत असलेले परदेशी क्रिकेटपटू, पंच व समालोचकांनीही घेतलेला आहे. ऑस्ट्रेलियन सरकारने 15 मेपर्यंत हिंदुस्थानातून येणारी विमाने बंद केली आहेत. यावर आयपीएलमध्ये समालोचन करीत असलेले मायकेल स्लेटर यांनी सोशल साईटवर टीका केली आहे.

वरुण, संदीप कोरोना पॉझिटीव्ह

कोलकाता नाईट रायडर्स संघातील वरुण चक्रवर्ती व संदीप वॉरियर या दोघांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. या दोघांचाही गेल्या चार दिवसांमधील तिसऱया फेरीचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. इतर खेळाडूंचा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आला असला तरी या संघाच्या पुढच्या लढतींवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या