
आपल्या प्रसिद्धीसाठी हपापलेले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी चुकीच्या धोरणामुळे आज देशवासिय मृत्यूच्या जबड्यात ढकलले गेले आहेत. गेल्या वर्षी त्यांनी आयोजित केलेल्या “दिया जलाओ” उत्सवाचा परिणाम आता देशभर प्राणवायु व औषधांच्या अभावाने मृत पावलेल्या शेकडो लोकांच्या चिता जळण्यात दिसत आहे, अशी घणाघाती टिका गोवा कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली आहे.
आज एकीकडे विवीध माध्यमांवर शेकडो कोविडग्रस्त मृतांच्या चिता जळतानाचे फोटो व व्हिडीयो व्हायरल झाले असून दुसरीकडे आपल्या मृत नातेवाईंकावर अंत्यसंस्कार करण्यासाठी तासन तास उभे राहिलेल्या लोकांचे मन हेलावुन टाकणारे फोटो दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सामान्य लोकांप्रती असलेल्या असंवेदनशीलतेमुळेच हा प्रसंग उभा राहिला आहे.
देशातील हजारो लोक आपल्या प्रियजनांचे प्राण वाचविण्यासाठी प्राणवायु व औषधे शोधत धावपळ करीत असताना प्रसिद्धीसाठी हपापलेले भाजप सरकार “टिका उत्सव” आयोजित करुन तेथे मोदी-शहा व इतर भाजप पदाधिकाऱ्यांचे फोटो असलेले बॅनर लावुन राजकीय फायदा उठविण्याचा प्रयत्न करीत आहे. गोव्याचे मुख्यमंत्री व इतर मंत्री तसेच भाजपचे आमदार व पदाधिकारी टिका उत्सवात हजेरी लावुन तेथे आपले फोटो काढुन घेतात हे दुर्देवी आहे.
कोविडचे संकट उग्र होत असतानाच केंद्रीय सार्वजनिक बांधकाम खात्याने 20 एप्रिल रोजी निविदा जारी करुन दिल्ली येथे “सेंट्रल विस्ता” प्रकल्पात समाविष्ट विवीध मंत्रालयांसाठी केंद्रीय सचिवालय उभारण्यासाठी रूपये 3408 कोटींची निवीदा जारी केली आहे. भाजपचे हेच धोरण गोव्यातील सरकार पुढे नेत असून सुमारे 10 ते 15 कोटी वायफळ खर्च करुन माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रिकर यांचे स्मृतीस्थळ बांधण्याचे काम सरकारने सुरू केले आहे. भाजपला वाढीव कमिशनचा हिस्सा मिळावा म्हणून प्रकल्पाचा खर्च वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक सदर स्मृतीस्थळाचे बांधकाम संथ गतीने करण्यात येत आहे, असा आरोप गिरीश चोडणकर यांनी केला आहे.
आज केंद्र सरकारकडे राज्यांना मोफत कोविड लसी पुरविण्यासाठी निधी उपलब्ध नाही. गोवा सरकार सरकारी इस्पितळातील सर्व खाटा भरलेल्या असतानाही कोविड रुग्णांना खासगी इस्पितळात मोफत उपचार देण्यास तयार नाही. परंतु, नविन प्रकल्प व स्मृतीस्थळांवर वायफळ खर्च करण्यास सरकार तयार आहे. भाजपचे केंद्र व राज्य सरकार सामान्य लोकांना दिलासा देण्यास पूर्णपणे अपयशी ठरले आहे. मोदी-शहांच्या क्रोनी क्लबला फायदा मिळवुन देण्याचे एकमेव धोरण हे सरकार पुढे नेत आहे. गरिबांचे या सरकारला काहीच पडलेले नाही, असेही ते म्हणाले.

























































