हरिद्वारमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला; एक हजार जणांना कोरोनाची लागण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तराखंडमधील हरिद्वार येथे सुरू असलेला कुंभमेळा कोरोनाचा सुपर स्प्रेडर बनण्याची दाट शक्यता असून, 48 तासांत येथे एक हजार जणांना संसर्ग झाला आहे. दरम्यान, बुधवारी शाही स्नानासाठी दुपारपर्यंतच दहा लाख भाविकांनी गर्दी केली होती.

देशभरात कोरोनाच्या दुसऱया लाटेचा उद्रेक झाला असतानाच हरिद्वारमध्ये कुंभमेळा सुरू आहे. मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा वापर या कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन येथे होताना दिसत नाही. गंगा स्नानासाठी लाखो भाविकांची गर्दी उसळत आहे.

काय आहे स्थिती?

  • हरिद्वार येथे 50 हजार जणांची कोरोना चाचणी केली. त्यात सोमवारी 408 पॉझिटिव्ह आले. मंगळवारी आणखी 594 जणांची यात भर पडली आहे.
  • सोमवारी शाही स्नानावेळी 35 लाखांवर भाविकांनी गंगानदीत स्नान केले. बुधवारीही शाहीस्नान होते. दुपारी 2 पर्यंत 10 लाख भाविक साधुंनी स्नान केल्याची माहिती उत्तराखंडचे पोलीस महानिरीक्षक अशोक कुमार यांनी दिली.

दोन आठवडे आधी कुंभमेळा समाप्तीची घोषणा होऊ शकते

कोरोना संक्रमण मोठय़ा प्रमाणावर वाढत असल्यामुळे कुंभमेळा दोन आठवडे आधीच समाप्त करण्याची घोषणा होऊ शकते. त्यासाठी उत्तराखंड सरकार आणि प्रमुख साधूंमध्ये चर्चा सुरू असल्याचे वृत्त आहे. 27 एप्रिल रोजी महत्त्वाचे शाही स्नान आहे. त्यावेळी पुन्हा लाखोंची गर्दी उसळू शकते. त्यात कोरोना संसर्ग आणखी वाढण्याची भिती आहे. त्यामुळे कुंभमेळ्याचा कालावधी कमी करण्यासाठी विचार सुरू आहे.