सिंगापूरमध्ये कोरोनाचा धोका वाढला; रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढतेय, मास्क घालण्याचा सल्ला

 

 

सिंगापूरमध्ये कोरोनाचा धोका वाढला असून या ठिकाणी दररोज कोरोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. 5 ते 11 मे या दरम्यान एकटय़ा सिंगापूरमध्ये जवळपास 26 हजार कोरोना रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे सिंगापूरचे आरोग्यमंत्री ओंग ये पुंग यांनी नागरिकांना मास्क घालण्याची सूचना केली आहे. सिंगापूरमध्ये सध्या कोरोनाची लाट दिसत आहे. या ठिकाणी कोरोना रुग्ण झपाटय़ाने वाढत आहेत. पुढील दोन ते चार आठवडय़ात ही लाट आणखी वाढण्याची शक्यता असल्याने जूनच्या मध्यभागी सिंगापूरमध्ये कोरोनाचे रुग्ण लाखाच्या जवळपास जाण्याची भीती वर्तवली जात आहे. सिंगापूरमधील नागरिकांनी मास्क घालावे, शक्य होईल तितके घरी राहावे, लस घ्यावी, असे आवाहन आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात आले आहे.

रोज 250 रुग्ण

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 5 ते 11 मे या दरम्यान कोविड-19 ची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. मागील आठवडय़ात 13,700 रुग्णांवरून थेट 25,900 रुग्ण झाले आहेत. रुग्णालयात सरासरी रोज 250 रुग्ण येत आहेत, असेही आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

घरीच उपचार करण्याचा सल्ला

सार्वजनिक रुग्णांलयात होणारी गर्दी टाळण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने कोरोना रुग्णांना घरीच उपचार करण्याची सोय उपलब्ध करून दिली जाईल, असे म्हटले आहे.