कोल्हापूरात भूदरगड तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव

442

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव नियंत्रणात येत असतानाच आता शाहुवाडीपाठोपाठ भुदरगड तालुक्यातील आकुर्डी या ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव झाल्याचे बुधवारी स्पष्ट झाले आहे. मुंबईहून सिंधुदुर्ग जिल्ह्यात एका गरोदर महिलेला सोडून मूळ गावी परतलेल्या 54 वर्षांच्या वाहन चालकाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचा अहवाल मिळाला आहे.

मुंबईच वाहनचालक असणाऱ्या या व्यक्तीने ओटवणे, जि.सिंधुदुर्ग या गावात एका गरोदर महिलेला सोडले. तेथून मुंबईला परत न जाता तो आपल्या मूळ गावी आकुर्डी येथे आला होता. त्यामुळे गावातच ग्रामसमितीने त्याला होम क्वॉरंटाईन केले होते. मात्र, होम क्वारंटाईनची 14 दिवसांची मदत पूर्ण होण्यापूर्वीच त्याला त्रास होऊ लागल्याने 16 एप्रिलला कडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले होते. तर सोमवारी छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या घशात दुखु लागल्याने स्त्राव तपासणीसाठी पाठवण्यात आला होता. बुधवारी पहाटे प्रशासनाला मिळालेला अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे या बाधित व्यक्तीच्या संपर्कात कोणकोण आले याचा शोध घेण्याचे काम प्रशासन करत आहे.

जिल्ह्यात 13 जण कोरोनाबाधित

भूदरगड तालुक्यात आणखी एक रुग्ण आढळल्याने कोरोनाबाधितांची संख्या 13 पोहोचली आहे. सध्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 9 आहे. त्यातील 8 जणांवर छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर एका कोरोनाबाधित लहान मुलावर इंचलकरंजी येथे उपचार सुरू आहेत. कोरोनामुक्त झालेल्या पाच रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या