
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. जीवनावश्यक वस्तूंसाठी दुकाने उघडी ठेवण्यात आलेली आहेत. परंतु शहरात बंदचा परिणाम चांगला दिसून येत असला तरी ग्रामीण भागात मात्र गांभीर्याचा अभाव दिसून येत आहे. शहरातही दवाखान्याच्या नावाखाली मुक्त संचार करणाऱ्यांचे प्रमाण वाढलेले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भात देशभरात वाढू नये यासाठी शासनाने देशभर संचारबंदी लागू केलेली आहे. 14 एप्रिलपर्यंत ही संचारबंदी राहणार आहे. लातूर जिल्ह्यातील शहरी भागात संचारबंदीला जोरदार प्रतिसाद मिळत आहे परंतु ग्रामीण भागात गांभीर्याचा अभाव असल्याचे स्पष्ट होत आहे. शहरी भागातील जिवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व व्यवहार ठप्प झालेला आहे. कांही ठिकाणी चोरुन दुकानांमूधन सुपारी, तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केली जात आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी किराणा दुकानांमधूनच गुटखा, सुपारी विकली जात असल्याचे निदर्शनास येत आहे. पोलीसांनी कांही प्रमाणात गुन्हेही दाखल केलेले आहेत. परंतु नागरीकांमध्ये त्याची जाणिव दिसून येत नाही. ग्रामीण भागात चोरुन पानटपरी सुरू ठेवण्याचे प्रकार दिसून येत आहेत.
शहरी भागात गांभीर्य दिसत असले तरी सकाळी घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या अधिक आहे. किराणा सामान खरेदी, भाजी खरेदी, औषधी खरेदीच्या नावाखाली रस्त्यावर भटकणाऱ्यांचे प्रमाणही अधिक आहे. लोक घराबाहेर पडण्यासच अधिक उत्सूक दिसत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. ग्रामीण भागात मात्र गांभीर्याचा अभाव दिसून येत आहे. अनेक गांवांमध्ये पुणे, मुंबई, हैद्राबाद, नाशिक, कोल्हापूर आदी भागातून कामासाठी गेलेले आपल्या गावी परत आलेले आहेत. त्याचा धसका मात्र नागरीक घेत असल्याचे दिसून येत आहे.
अहमदपूर तालुक्यातील ग्रामीण भागात निष्काळजीपणा
अहमदपूर तालुक्यातील ग्रामीण भागात संचारबंदीचे नियम पाळले जात नाहीत. शेतकऱ्यांनी ऊस, भुईमुगाची लागवड केलेली आहे. खुरपणीचे दिवस सध्या सुरू आहेत. ऊसाच्या एका प्लॉटमध्ये 10 ते 12 मजूर खूरपणीचे काम करीत आहेत. कांही गावांमधून हरभरा, गहू, ज्वारी काढण्याचे काम सुरु आहे. खेडोपाडी मुले क्रिकेट खेळताना दिसून येत आहेत. ग्रामीण भागातही संचारबंदीचे नियम काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे.
लातूर जिल्ह्यात पाण्याची टंचाई ही मोठी समस्या आहे. सध्या पाण्याची टंचाई तीव्र स्वरुप धारण करीत आहे. ग्रामीण भागात पाणी भरण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी नागरीक गर्दी करीत आहेत. भाजी खरेदी करण्यासाठी, किराणा साहित्य खरेदी करण्यासाठी, औषधे खरेदी करण्यासाठी दुकानांमधून मोठी गर्दी नागरीक करीत आहेत.


























































