लसीकरण झाले म्हणून बेफिकीर वागू नका; मास्क वापरा, अंतर पाळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाची दुसरी लाट ओसरली, लसीकरणाचा टक्काही वाढला. असे असताना कोरोना संसर्गाचे प्रमाण पुन्हा वाढलेय. याला लसीचे दोन डोस घेतल्यानंतर तोंडावरचा मास्क खाली उतरवून बिनधास्त फिरणारे लोक कारणीभूत असल्याचे निदर्शनास आले आहे. दोन डोसचे प्रमाणपत्र जणू कोरोनामुक्तीचे प्रमाणपत्र असल्याच्या जोशात अनेक ‘महाभाग’ वावरत आहेत. त्यांच्या बेफिकीर वागण्यामुळे कोरोनाचा धोका पुन्हा वाढला आहे. याबाबत आरोग्य क्षेत्रातील तज्ञांनी चिंता व्यक्त केली असून दोन डोस म्हणजे कोरोनाविरोधी ढाल नव्हे. लसीकरणानंतरही मास्क वापरा, अंतर पाळा, असा सल्ला तज्ञांनी दिला आहे.

दीड ते दोन महिने सतर्कतेचे, केंद्राच्या समितीतील तज्ञ; डॉ. गुलेरिया यांचा इशारा

देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत घट होत चालली आहे. मात्र कोरोना नियमावली पाळण्यात हयगय केल्यास कोरोना संसर्गाचा पुन्हा उद्रेक होऊ शकतो. आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पुढील दीड ते दोन महिने आपल्याला सतर्कता बाळगायलाच हवी, असा इशारा केंद्र सरकारच्या समितीतील तज्ञ आणि एम्स रुग्णालयाचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिला आहे.

सध्या कोरोना रुग्णसंख्येला उतरती कळा लागली आहे. मात्र येणाऱया सणासुदीच्या दिवसांत नियम पाळण्यात हलगर्जीपणा केला तर पुन्हा रुग्णवाढ होऊ शकते. तिसऱया लाटेला निमंत्रण मिळू शकते, असे डॉ. गुलेरिया यांनी म्हटले आहे. पुढील दीड ते दोन महिने अत्यंत महत्त्वाचे आहेत. या काळात दसरा, दिवाळी, छठपूजा, ख्रिसमस आदी सण येत आहेत. जर या कालावधीत आधीसारखीच खबरदारी घेतली गेली, तर कोरोना रुग्णसंख्येत घट होत राहील. मात्र सणासुदीत खरेदीसाठी बाजारपेठांत गर्दी केली तर ते विषाणूच्या फैलावाला पोषक वातावरण ठरेल. त्यामुळे आपल्याला सतर्कता व सावधानगिरी बाळगायलाच हवी, असा इशारा डॉ. गुलेरिया यांनी दिला आहे.