नवीन व्हेरियंट हिंदुस्थानींवर प्रभाव टाकू शकणार नाही! वाचा काय म्हणतात तज्ज्ञ…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चीनमध्ये कोरोनाने हाहाकार माजवला आहे. तिथे कोरोनाच्या बीएफ 7 या व्हेरियंटचं संक्रमण अत्यंत वेगाने होताना दिसत आहे. पण, याच दरम्यान हिंदुस्थानसाठी मात्र, दिलासादायक बातमी आहे. हा व्हेरियंट हिंदुस्थानी नागरिकांवर फारसा परिणाम करू शकणार नाही, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्यूलर बायोलॉजीचे संचालक विनय के. नंदीकूरी यांच्या म्हणण्यानुसार, बहुतांश हिंदुस्थानी नागरिकांकडे आता हायब्रीड इम्युनिटी आहे. हिंदुस्थानात करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेचा परिणाम म्हणून ही रोगप्रतिकारक क्षमता विकसित झाली आहे. त्यामुळे बीएफ 7 हा व्हेरियंट हिंदुस्थानी नागरिकांवर तितका परिणाम करू शकणार नाही, जितका चिनी नागरिकांवर करताना दिसत आहे.

चीनमध्ये कोरोनाने थैमान घातलं आहे. अवघ्या 20 दिवसात रुग्णांची संख्या 25 कोटी झाल्याचा दावा तिथले अहवाल करत आहेत. कोरोनाचा हा व्हेरियंट अमेरिका, इंग्लंड, बेल्जियम, जर्मनी, फ्रान्स आणि डेन्मार्कसह अनेक युरोपीय देशात फैलावला आहे. त्यामुळे हिंदुस्थानही आता अलर्ट मोडवर आहे. पण, नंदीकूरी आणि अन्य तज्ज्ञांच्या मते हा व्हेरियंट तितकासा प्रभावी ठरणार नाही.

त्यांच्या मते हा व्हेरियंट तितका प्रभावी ठरणार नाही, कारण एका मर्यादेपर्यंत आपण हर्ड इम्युनिटी मिळवली आहे. लसीकरणामुळे आपल्यात ती रोगप्रतिकारक क्षमता विकसित झाली असून हेच कारण आहे की ज्यामुळे अन्य विषाणूंच्या संपर्कात येऊनही आपण सुरक्षित वाचलो आहोत. चीनने लसीकरणाला गांभीर्याने प्राधान्य न दिल्याने त्यांच्यावर ही वेळ ओढवल्याचंही त्यांचं म्हणणं आहे.