
देशात कोरोना रोखण्यासाठी कोरोना चाचण्या आणि लसीकरणावर भर दिला जात असताना कोरोनाविरोधात सर्वसामान्यांची सायकलही रस्त्यावर उतरली आहे. कोरोनाविरोधातील लढाईत फिटनेस चांगला ठेवण्यासाठी लोकांनी सायकलला पसंती दिली आहे. वर्क फ्रॉम होम तसेच मोकळा वेळ असल्यामुळे सायकल चालवून फिटनेस ठेवण्याला हिंदुस्थानी लोकांनी पसंती दिली आहे.
हिंदुस्थानात गेल्या दीड वर्षापासून कोरोनाचा कहर सुरू आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊनसह काही कठोर निर्बंध लादण्यात आले. त्यामुळे कोटय़वधी लोक घरात राहूनच काम करत आहेत. अजूनही अनेक राज्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात निर्बंध लागू आहेत. निर्बंधांमुळे देशभरातील उद्योगांचे पंबरडे मोडले आहे. मात्र एका उद्योगाला कोरोनामुळे चांगले दिवस आले आहेत. लॉकडाऊनमध्ये देशात सायकलीची मागणी 20 टक्क्यांनी वाढली आहे. ‘क्रिसिल’या उद्योगांना मानांकन देणाऱया संस्थेने ही माहिती दिली.
मागणी 1 कोटी 45 लाखांपर्यंत पोहोचणार
‘क्रिसिल’ने दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या आर्थिक वर्षात सायकलची मागणी 1 कोटी 20 लाखांच्या आसपास होती, मात्र चालू आर्थिक वर्षांत त्यामध्ये 1 कोटी 45 लाखांपर्यंत वाढ होणार आहे. कोरोनामुळे फिटनेसविषयी आलेली जागरूकता, निर्बंधांमुळे घरून काम करणारे आणि मोकळा वेळ असल्यामुळे सायकलची मागणी वाढली आहे, असे ‘क्रिसिल’ने अहवालात म्हटले आहे.
प्रीमियम-किड्स सायकलींना पसंती!
सायकलचे साधारणपणे चार प्रकारांमध्ये वर्गीकरण केले जाते. यामध्ये स्टॅण्डर्ड, प्रीमियम, किड्स आणि एक्स्पोर्ट अशा चार प्रकारांचा समावेश आहे. यापैकी स्टॅण्डर्ड प्रकारच्या सायकलची मागणी 50 टक्के आहे. या प्रकारच्या सायकल थेट सरकारकडून खरेदी करून विविध प्रकारच्या योजनांमध्ये त्यांचे वाटप केले जाते. त्यानंतर प्रीमियम आणि किड्स या दोन प्रकारच्या सायकलच्या मागणीचे प्रमाण 40 टक्के तर निर्यात व इतर प्रकारच्या सायकलींसाठीच्या मागणीचे प्रमाण 10 टक्के आहे.

























































