कोरोना काळात शाळा बदलणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर अडचणी, सरल प्रणालीवर हजेरीची नोंदच होईना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना काळात खासगी इंग्रजी शाळांची फी भरणे शक्य न झाल्याने अनेक विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद आणि महापालिका शाळांमध्ये प्रवेश घेतला. या विद्यार्थ्यांना आता प्रवेशाच्या तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मागील एक वर्षापासून हे विद्यार्थी नवीन शाळेत शिक्षण घेत असले तरी त्यांच्या हजेरीची नोंद शाळेतील सरल ऑनलाइन पोर्टलवर दिसत नाही. जुन्या शाळेने या विद्यार्थ्यांची नावे अद्याप शाळेतून न वगळल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. काही शाळांच्या मुख्याध्यापकांनी पालकांना जुन्या शाळेतून शाळा सोडल्याचा दाखला आणण्याच्या सूचना दिल्या आहेत, पण कोरोनाकाळातील फी भरल्याशिवाय विद्यार्थ्यांचा दाखला न देण्याचा पवित्रा शाळांनी घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या प्रवेशप्रक्रियेच्या या तांत्रिक समस्येचा सध्या पालकांना चांगलाच मनस्ताप होत आहे.

जुलै 2021 ला मुंबई महापालिका शिक्षण विभागाने परिपत्रक काढून पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखल नसला तरी त्यांच्या वयानुसार संबंधित वर्गात प्रवेश देण्याचे निर्देश दिले होते. एका शाळेतून दुसऱया शाळेत प्रवेश घेताना मूळ शाळेतून शाळा सोडल्याचा दाखला तत्काळ मिळणे आवश्यक आहे. मात्र काही कारणास्तव दाखला मिळण्यास उशीर होत असेल किंवा दाखला नाकारला जात असेल तर विद्यार्थी प्रवेशित होणाऱया शाळेने विद्यार्थ्याच्या वयानुसार प्रवेश द्यावा, अशा सूचना मुंबई महापालिका शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी दिल्या होत्या. त्यानुसार खासगी शाळांमधील अनेक विद्यार्थी मुंबई महापालिका तसेच अन्य शाळेत दाखल झाले. सध्या विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरळीत सुरू असले तरी त्या विद्यार्थ्यांची सरल प्रणालीवर नोंद शाळेला करता येत नाही. नव्या शाळेतून विद्यार्थ्यांची सरलवर नोंद होण्यासाठी जुन्या शाळेने या विद्यार्थ्यांची नावे त्यांच्या सरल प्रणालीतून काढून टाकणे आवश्यक आहे. पण पालकांकडून थकीत फी मिळविण्यासाठी खासगी शाळा विद्यार्थ्यांची नावे शाळेतून वगळत नसल्याचे समोर आले आहे.

दहावीचा परीक्षा अर्ज भरण्यास अडचण नाही

शाळेच्या सरल प्रणालीवर नोंद नसणाऱया विद्यार्थ्यांना दहावीचा परीक्षा अर्ज भरण्यास कोणतीही अडचण येणार नाही, असे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले. पालकांनी विनाकारण घाबरून जाऊ नये. विद्यार्थी शिकत असलेल्या शाळेतूनच त्याला परीक्षेला बसता येईल, असेही ते म्हणाले. याप्रकरणी महापालिका शिक्षणाधिकाऱयांकडे संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणाची माहिती घेण्यात येईल, असे सांगितले. तसेच एकाही विद्यार्थ्याचा प्रवेश अडचणीत येणार नाही, ग्वाहीदेखील दिली.

नवीन शाळेत प्रवेश घेतल्यानंतर जुन्या शाळेने विद्यार्थ्यांचे दाखले दिले नाहीत किंवा सरल प्रणालीवरून विद्यार्थ्यांची नावे नवीन शाळेत ट्रान्सफर केली नाहीत तर नव्या शाळेने शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे अशा विद्यार्थ्यांची यादी पाठवावी. शिक्षण विभाग स्वतःच्या अधिकाराचा वापर करून सरल पोर्टलवर या विद्यार्थ्याची नावे नव्या शाळेत अपडेट करू शकतात.
– सुभाष मोरे, कार्यवाह, शिक्षक भारती

कोरोना काळात अनेक पालकांनी आपल्या पाल्याला खासगी इंग्रजी शाळेतून मुंबई पब्लिक स्कूलमध्ये प्रवेश घेतला होता. त्यावेळी पालकांनी खासगी शाळा विद्यार्थ्यांचा शाळा सोडल्याचा दाखला देत नाही अशा तक्रारीदेखील केल्या होत्या. याची दखल घेत युवासेनेने याविषयी महापालिका शिक्षणाधिकारी राजू तडवी यांच्याकडे संपर्क साधला असता त्यांनी ट्रान्सफर सर्टिफिकेटशिवाय विद्यार्थ्यांना वयाच्या पुराव्याआधारे शाळेत प्रवेश देण्याच्या सूचना दिल्या आहेत. आता विद्यार्थ्यांना याविषयी कोणताही त्रास होत असेल तर युवासेना त्याची नक्कीच दखल घेईल.
– साईनाथ दुर्गे, कार्यकारिणी सदस्य, युवासेना