मुंबईत कोरोना रुग्णांची वाढ मंदावली; डेली ग्रोथ रेट 3 टक्क्यांपेक्षा कमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
corona-virus-new-lates

मुंबईत कोरोनाचे रुग्ण इतर शहरांच्या तुलनेत जास्त असले तरी आता कोरोनाची लागण होण्याचे सरासरी प्रमाण हळूहळू कमी होऊ लागले आहे. कोरोनाचा डेली ग्रोथ रेट 3 टक्क्यांपेक्षा कमी होऊन तो 2.93 टक्क्यांवर आला आहे. कोरोना रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारकडून सुरू असलेल्या एकत्रित प्रयत्नाचे हे यश आहे.

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकार आणि पालिका प्रशासनाने जोरदार मोहीम राबवली आहे. वरळी असो की, धारावी फिव्हर क्लिनिक, आयसोलेशन आणि क्वारंटाईन व्यक्तींसाठी कोरोना सेंटर्स, घरोघरी जाऊन तपासणी, ज्येष्ठांच्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण शोधण्यासाठी विशेष मोहीम राबवली गेली. कोरोना रुग्णांना जास्तीत जास्त वैद्यकीय सुविधा मिळाव्यात आणि ते लवकर कोरोनामुक्त व्हावेत, यासाठी पालिका, खासगी रुग्णालये आणि कोरोनासाठी पूर्णवेळ रुग्णालये कमी वेळेत उभारण्यात आली. त्याच जोडीला पालिका, खासगी शाळा, क्रीडा संकुलामध्ये आयसोलेशन आणि क्वारंटाईन व्यवस्था करण्यात आली. मुंबईतील दाटीवाटीच्या भागांमुळे कोरोना रुग्णांची संख्या 50 हजारच्या पुढे गेली असली तरी प्रत्यक्ष अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण 25 हजारच्या आसपास आहेत तर 21 हजारपेक्षा जास्त रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत.

भायखळा, शीवमध्ये सर्वात कमी रेट
मुंबईत ज्या प्रभागांमध्ये सुरुवातीला कोरोनाची रुग्ण संख्या मोठी होती तिथे आता कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश आले आहे. भायखळा, चिंचपोकळी, माजगाव या ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या 3 हजारच्या आसपास आहे. तर माटुंगा, शीव आणि वडाळ्यातही हा आकडा 3 हजारच्या आसपास आहे. मात्र, असे असताना कोरोनाचा डेली ग्रोथ रेट 1.5 इतका कमी आहे. धारावीत रोजचे रुग्ण वाढण्याचे प्रमाण 1.6, वांद्रे पूर्वमध्ये 1.7 तर वरळी आणि गोवंडीत ग्रोथ रेट 1.8 टक्के आहे.

5 वॉर्डमध्ये 3 टक्क्यांपेक्षा कमी रेट
मुंबईतील 5 प्रभागांमध्ये कोरोना डेली ग्रोथ रेट 2 टक्क्यांपेक्षा जास्त आणि 3 टक्क्यांपेक्षा कमी आहे. यात कुलाबा 2.3 टक्के, मोहम्मद अली रोड 2.4, मलबार हिल 2.7 टक्के, अंधेरी पश्चिम 2.4 तर कुर्ल्यात 2 टक्के रेट आहे. मात्र, मुलुंड, भांडुप, बोरिवली, गोरेगाव, अंधेरी पूर्व आणि काळबादेवीमध्ये कोरोना डेली ग्रोथ रेट 4 ते 5 टक्क्यांच्या दरम्यान आहे.

मालाड, दहिसर, कांदिवलीत 5 ते 6 टक्के
कोरोनाच्या सुरुवातीच्या दिवसात मालाड, दहिसर आणि कांदिवली या भागांत कोरोनाचा संसर्ग कमी होता. मात्र, याच भागांत आता कोरोना होण्याचे दररोजचे प्रमाण वाढले आहे. मालाडमध्ये 6.1, दहिसरमध्ये 5.5 तर कांदिवलीत डेली ग्रोथ रेट 5.3 इतका आहे.