
अकोला जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी 7 वाजेपर्यंत कोरोना संसर्ग तपासणीचे 35 अहवाल मिळाले. त्यातील 30 अहवाल निगेटिव्ह तर पाच अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. नव्याने पॉझिटिव्ह आढळलेल्या पाच पॉझिटीव्ह अहवालांमध्ये एका मृत महिलेचा समावेश आहे. तर इतर चारजण दीपक चौक परिसरातील रहिवासी आहे. हे चौघे एकाच कुटूंबातील सदस्य आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार,आतापर्यंत एकूण 649 नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी 622 अहवाल आले आहेत. आतापर्यंत एकूण 595 अहवाल निगेटिव्ह तर 27 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर ३२ अहवाल प्रलंबित आहेत.
आतापर्यंत एकूण 649 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 521, फेरतपासणीचे 87 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 41 नमुने होते. आतापर्यंत एकूण 622 अहवाल मिळाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 496 तर फेरतपासणीचे 85 व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 41 अहवाल आहेत. एकूण निगेटिव्ह अहवालांची संख्या 595 आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल 27 आहेत. बुधवारी मिळालेल्या 35 अहवालात 30 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर पाच पॉझिटिव्ह आहेत. निगेटिव्ह अहवालात सिंधी कॅम्पमधील रुग्णाच्या संपर्कातील आठ जणांच्या अहवालाचाही समावेश आहे. सिंधी कॅम्पमधील रुग्णाच्या संपर्कातील 54 जणांची तपासणी आतापर्यंत झाली असून त्यातील 50 जणांचे अहवाल मिळाले आहेत. आता फक्त चार जणांचे अहवाल प्रलंबित आहेत, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने स्पष्ट केले आहे.
सायंकाळी उशीरा मिळालेले पाचही अहवाल पॉझिटिव्ह
बुधवारी सायंकाळी 7 वाजता मिळालेल्या अहवालात पाच अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात बैदपूरा भागातील महिलेचा समावेश आहे. ही महिला अत्यवस्थ अवस्थेत मंगळवारी दुपारी रुग्णालयात दाखल झाली. दाखल झाल्यावर काही वेळातच तिचा मृत्यू झाला. या महिलेच्या घशातील स्त्रावाचा नमुना घेण्यात आला होता. त्याचा अहवाल सायंकाळी प्राप्त झाला. तो पॉझिटिव्ह आला. त्यानंतर उर्वरित चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. हे चौघे एकाच कुटुंबातील सदस्य आहेत. जिल्ह्यात आता एकूण कोरोनाबाधित रुग्णसंख्या 27 झाली आहे. त्यात तिघांचा मृत्यू झाला आहे. 23 तारखेला सात तर 27 तारखेला एका व्यक्तीला असे एकूण आठ जणांना घरी सोडण्यात आले. आता 16 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सूत्रांनी दिली आहे.


























































