कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने स्वारातीच्या डॉक्टरांवर ताण; कोव्हिड आयसीयु सुरु करण्याची मागणी

अंबाजोगाई शहर आणि परिसरातील गावात कोरोना रुग्णाच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. इतर कोव्हिड सेंटर बंद असल्यामुळे सर्व रुग्णांना स्वारातीच्या कोव्हिड केअर सेंटरमध्ये दाखल करावे लागत आहे. या रुग्ण सेवेचा ताण स्वारातीच्या डॉक्टरांवर येत आहे. बीड जिल्ह्यात अंबाजोगाई तालुक्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

बीड जिल्ह्यातील कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाचे कोवीड केअर सेंटर आणि लोखंडी सावरगाव येथील कोव्हिड केअर सेंटर आघाडीवर आहे. सध्या स्वारातीच्या कोवीड केअर सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्यांची संख्या 70 वर पोहचली आहे. तर 150 रुग्ण क्षमता असलेल्या लोखंडी सावरगाव येथील कोव्हिड केअर सेंटरमध्ये 29 रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.

मध्यंतरी कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर लोखंडी सावरगाव व स्वारातीच्या कोव्हिड केअर सेंटरमधील वैद्यकीय स्टाफ शासनाच्या निर्देशानुसार कमी करण्यात आला होता. मात्र, अचानक कोवीड रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने या रुग्णसेवेचा ताण आता स्वारातीचे कोव्हिड केअर सेंटर सांभाळणाऱ्या मेडिसीन विभागाच्या डॉक्टरांवर येत आहे. स्वारातीच्या कोव्हिड केअर सेंटरमध्ये सध्या कोव्हिडच्या 63 रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.

स्वारातीच्या कोव्हिड केअर सेंटरच्या रुग्णसेवेचा भार हा वैद्यकीय महाविद्यालयाच्या मेडिसीन विभागावर आहे. या विभागात काम करणाऱ्या डॉक्टरांना मेडिसीन विभागाची ओपीडी, महिला अंतररुग्ण कक्षाचे दोन कक्ष, पुरुष विभागाचे दोन कक्ष, मेडिसीन विभागाचे आयसीयु आणि तात्काळ उपचार कक्षात येणारे रुग्ण यांची तपासणी आणि उपचार पध्दतीवर नियंत्रण ठेवावे लागते. त्यात आता कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे त्यांच्यावरील ताण वाढत आहे.

अंबाजोगाईत 19 नवे रुग्ण
अंबाजोगाई तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून सोमवारी 19 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. या 19 रुग्णांपैकी 10 रुग्ण नवीन असून 9 रुग्ण जुन्या रुग्णांच्या सहवासात आलेले रुग्ण आहेत. हे सर्व रुग्ण आता स्वारातीच्या आणि लोखंडीसारवाव येथील कोवीड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल होणार असल्यामुळे ता या दोन्ही सेंटरच्या रुग्णांत वाढ होणार आहे.

कोव्हिडचे आसीयु बंद..
कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असताना कोव्हिडचे आयसीयु बंद असल्यामुळे अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे कोव्हिडचे आयसीयु तात्काळ सुरु करण्याची मागणी करण्यात येत आहे.

दोन कोव्हिड केअर सेंटर सुरू
अंबाजोगाई शहरात कोव्हिड रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्णसंख्या जसजशी वाढत जाईल तसतशी रुग्णसेवा वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल. सध्या लोखंडी सावरगाव आणि स्वारातीचे कोव्हिड केअर सेंटर असे दोन कोव्हिड केअर सेंटर सुरु आहेत.
– डॉ. बाळासाहेब लोमटे, तालुका आरोग्य अधिकारी, अंबाजोगाई

आयसीयु सुरु करण्याचे प्रयत्न सुरु
कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे मध्यंतरी स्वारातीच्या कोव्हिड केअर सेंटरचे आसीयु बंद करण्यात आले होते. मात्र काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे आयसीयु सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारपासून आयसीयु सुरु करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे.
– डॉ. राजेश कचरे, उपअधिष्ठाता, स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय

आपली प्रतिक्रिया द्या