बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीचे ‘अर्धशतक’

606

काही दिवसांपूर्वी बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीने चाळीशी पार केली होती. आता याच श्रृंखलेत रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीने शनिवारी 50 दिवसांचा टप्पा गाठत ‘अर्धशतक’ केले आहे. तर रुग्ण वाढीचा वेग देखील 1.72 टक्क्यांवरुन 1.39 टक्क्यांवर आला आहे. महापालिकेच्या विविध स्तरीय उपाययोजनांचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत.

रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीचे विभागस्तरीय विश्लेषण केले असता, हा कालावधी वांद्रे पूर्व – खार पूर्व – सांताक्रूज पूर्व इत्यादी परिसरांचा समावेश असलेल्या ‘एच पूर्व’ विभागात 134 दिवस एवढा झाला आहे. तर या खालोखाल मशीद बंदर – सँडहर्स्ट रोड या रेल्वे स्थानकांनजिकच्या परिसराचा समावेश असलेल्या ‘बी’ विभागात 98 दिवस; कुर्ला परिसराचा समावेश असलेल्या ‘एल’ विभागात 88 दिवस; दादर ट्राम टर्मिनस – वडाळा – माटुंगा – शीव इत्यादी परिसराचा समावेश असलेल्या ‘एफ उत्तर’ विभागात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 79 दिवस एवढा झाला आहे. उर्वरित 20 विभागांपैकी 10 विभागांमध्ये हा कालावधी 50 दिवसांपेक्षा अधिक आहे.

रुग्णसंख्येतील दैनंदिन सरासरी टक्केवारीच्या वाढीत सातत्याने घट
महापालिका क्षेत्रात रुग्ण संख्येत होणाऱ्या दैनंदिन वाढीची सरासरी टक्केवारी ही दिवसेंदिवस कमी होत आहे. 24 जून 2020 रोजी दिवस अखेरीस हा दर सरासरी 1.72 टक्के एवढा होता. ज्यात आता ‘सकारात्मक घट’ नोंदविण्यात आली असून हा दर शनिवारी सरासरी 1.39 टक्के एवढा झाला आहे. विभागस्तरीय आकडेवारीचा विचार केल्यास सर्वात कमी दर हा ‘एच पूर्व’ विभागात 0.5 टक्के, ‘बी’ विभागामध्ये 0.7 टक्के, ‘एल’ विभागात 0.8 टक्के आणि ‘एफ उत्तर’ विभागात 0.9 टक्के एवढा नोदविण्यात आला आहे. उर्वरित 20 विभागांपैकी 11 विभागांमधील सरासरी दैनंदिन रुग्णवाढीचा हा 1.5 टक्क्यांपेक्षा कमी आहे.

आपली प्रतिक्रिया द्या