
धाराशिव येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोनाच्या 400 रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. त्यामुळे या रुग्णांच्या नातेवाईकांची गर्दी जिल्हा शासकीय रुग्णालयात होत होती. काहीही केले तरी गर्दी कमी होत नव्हती. शेवटी प्रशासनाच्या वतीने अशा नातेवाईकांची अँटीजेन चाचणी घेण्यात आली. तेव्हा तब्बल 19 नातेवाईकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने, हेच नातेवाईक कोरोनाचे ‘सुपर स्प्रेडर’ ठरत असल्याची बाब समोर आली आहे.
सध्या धाराशिव जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात सध्या सुमारे सहा हजार कोरोना अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. यामध्ये मोठय़ा संख्याने रुग्ण होम आयसोलेशन तसेच कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. ज्या रुग्णांना ऑक्सीजन किंवा व्हेंटीलेटरची आवश्यकता आहे अशा सुमारे चारशे रुग्णावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अशा कोरोनाचे रुग्णांचे नातेवाईक जिल्हा रुग्णालय परिसरात गर्दी करत असल्याची बाब अनेकदा निदर्शनास आली आहे. अतिदक्षता विभागातील रुग्णांना नातेवाईकांची आवश्यकता असते. ही बाब सोडली तर इतर ठिकाणी देखील रुग्णांच्या नातेवाईकाची गर्दी दिसत होती. शिवाय हे नातेवाईक शहरात सगळीकडे वावरत होते, घरी डबा घेऊन येणे बाहेर रुग्णांना आवश्यक वस्तु घेऊन येणे आदीसाठी त्यांचा वावर होता.
मंगळवारी रात्री उशिरा जिल्हाधिकारी तसेच इतर वरिष्ठ अधिकारी पाहणी करण्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात गेले असता त्यांना रुग्णालयात नातेवाईकांची मोठी गर्दी आढळून आली. यावेळी जिल्हाधिकाऱयांच्या आदेशाप्रमाणे दंगल विरोधी पथकाला पाचारण करुन अशा लोकांचा शोध घेऊन त्यांच्या टेस्ट करण्यात आल्या. तेव्हा तिथे फक्त 40 ते 45 जणच सापडले. त्या सगळ्याची टेस्ट केल्यानंतर त्यातील 19 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्याना होम क्वारंटाईन न करता थेट सीसीसीमध्ये हलविण्याचे प्रशासनाने आदेश दिले आहेत.
जिल्हाधिकाऱयांची बैठक, नातेवाईकांना प्रवेश बंद
या बाबीचे गांभीर्य लक्षात घेत जिल्हाधिकारी कौस्तूभ दिवेगावकर यांनी कोरोना वॉर रुमध्ये यासंदर्भात महत्वाच्या अधिकाऱयांची बैठक घेतली. या बैठकीत जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना प्रवेश बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. फक्त अतिदक्षता विभागात जे वयस्कर रुग्ण आहेत, अशा रुग्णांच्या नातेवाईकांना कोविड नियमांचे पालन करुन प्रवेश देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
विनाकारण फिरणाऱयांची नगर परिषदेच्या वतीने कोरोना टेस्ट
कोरोनाची लाट आटोक्यात आणण्यासाठी शासन तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र तरीही कांही नागरिक बिनधास्तपणे विनाकारण फिरताना आढळून येत आहेत. अशा लोकांची नगर परिषदेच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अँटीजेन चाचणी करण्यात आली. यावेळी सुमारे 93 विनाकारण फिरणाऱया नागरीकांची अँटीजेन चाचणी करण्यात आली. या चाचणीत 9 नागरीकांच्या टेस्ट या पॉझिटिव्ह आल्या आहेत. तसेच धाराशिव नगर परिषदेच्या वतीने शहरात विनाकारण तसेच विनामास्क फिरणाऱया नागरीकांवर कारवाईसाठी 8 पथके तैनात करण्यात आली आहे. तसेच ‘माझे कुटूंब – माझी जवाबदारी’ या मोहिमे अंतर्गत 19 पथके तयार करण्यात आली असून ही पथके शहरातील प्रत्येक घरात जाऊन नागरिकांची तपासणी करत असल्याची माहिती धाराशिव नगर परिषदेचे मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे यांनी दिली.



























































