नगर जिल्ह्यातील 57 व्यक्तींच्या स्त्राव चाचणी अहवालाची प्रतीक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे गुरुवारी पाठविलेल्या 33 व्यक्तींच्या घशातील स्त्राव चाचणीचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. आणखी 24 व्यक्तींच्या घशातील स्त्राव नमुने शुक्रवारी तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर यांनी दिली.

नगर जिल्हा रुग्णालयाच्या वतीने आतापर्यंत 1235 व्यक्तींचे स्त्राव नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील 1166 व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ज्या अहवालाची प्रतीक्षा आहे, त्यात 14 दिवस पूर्ण केलेल्या आणखी दोन परदेशी नागरिकांचा समावेश आहे. शुक्रवारी पाठविण्यात आलेल्या अहवालात 14 दिवस पूर्ण केलेल्या 9 कोरोनाबाधीत व्यक्तींच्या स्त्राव चाचणीचा समावेश आहे. जिल्ह्यात सारीचे रुग्णही आढळत असून 11 एप्रिलपासून ते गुरुवारपर्यंत 42 रूग्ण आढळले आहेत. सारीच्या रुग्णांमध्ये शुक्रवारी वाढ झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.