कोरोनाच्या युद्धात 70 ठाणेकरांची सरशी; जिल्ह्यात 25 टक्के रुग्ण घरी परतले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ठाणे जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असला तरी या युद्धात यशस्वी सरशी करून 70 ठाणेकर ठणठणीत बरे झाले आहेत. जिल्ह्यात शनिवारपर्यंत एकूण 364 कोरोनाबाधित आढळले असून वेळीच निदान व उपचार झाल्यामुळे 25 टक्के रुग्ण घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या रेड झोनमध्ये असलेला ठाणे जिल्हा लवकरच ग्रीन झोनमध्ये येईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

मुंबई, पुण्यापाठोपाठ ठाण्यात कोरोनाची सर्वाधिक लागण झाल्याची आकडेवारी आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई ही शहरे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरली आहेत. जिल्ह्यात शनिवारपर्यंत 10 हजार कोरोना संशयित रुग्ण आढळले असून त्यापैकी 6,276 जण होम क्वारंटाईन आहेत. तर दीड हजारहून अधिक रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी 364 जण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. रुग्ण संख्येत रोज दोन आकडी वाढ होत असून आतापर्यंत 12 रुग्णांचा दुर्दैवी बळी गेला आहे. मात्र या चिंताजनक वातावरणातही आशेचा किरण दिसत आहे. जिल्ह्यात ठणठणीत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. एकूण रुग्णांपैकी 70 जणांनी कोरोनाशी युद्ध जिंकून घरवापसी केली आहे. म्हणजे 25 टक्के रुग्ण उपचारानंतर घरी परतले आहेत.

कल्याण- डोंबिवलीकर आघाडीवर
कोरोनाशी युद्ध जिंकण्यात कल्याण- डोंबिवलीकर आघाडीवर आहेत. या दोन्ही शहरांमध्ये 73 रुग्ण कोरोनाबाधित असून त्यापैकी 26 जण उपचारानंतर घरी परतले आहेत. त्याखालोखाल नवी मुंबईचा क्रमांक लागतो. नवी मुंबई पालिका क्षेत्रामध्ये 69 कोरोनाग्रस्त असून त्यापैकी 23 जण पूर्ण बरे झाले आहेत. कोरोनाग्रस्तांच्या यादीमध्ये सर्वाधिक शंभरी पार केलेले ठाणे मात्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. शनिवारपर्यंत ठाणे पालिका क्षेत्रामध्ये तब्बल 130 रुग्णांची नोंद झाली असून 12 ठाणेकर उपचारानंतर ठणठणीत बरे झाले आहेत.

टिटवाळावासियांना बाप्पा पावला, कोरोनामुक्तीचा प्रसाद मिळाला
टिटवाळा शहरातील एकमेव कोरोनाबाधित महिला रुग्ण उपचारानंतर पूर्णपणे बरे होऊन रविवारी घरी परतली आहे. सकाळी घराच्या परिसरात प्रवेश करताच टाळ्या वाजवून, शंखनाद करून आणि फुलांचा वर्षाव करत तिचे स्वागत करण्यात आले. महिला ही मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत होती. रुग्णसेवा देताना तिला कोरोनाची लागण झाली. मात्र बाप्पा पावला असून आता टिटवाळा कोरोनामुक्त झाला आहे. सोसायटीमध्ये या परिचारिकेचे स्वागत झाल्यानंतर येथील रहिवाशांनी ‘तुम्ही आमच्या कुटुंबातल्या त्यामुळे मनात कुठलाही संकोच आणू नका, असे म्हणताच त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.