कोरोनातही पुणे पोलिसांच्या भरोसा सेलकडून नागरिकांना मदतीचा हात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
pune-police

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोटपणे लॉकडाउनची अंमलबजावणी केली जात आहे. त्यामुळे अनेकांना घराबाहेर पडता येत नाही. दरम्यान, अशा परिस्थितीमध्ये अनेक जेष्ठ नागरिकांना पुणे पोलिसांनी मुलाची गरज भासू दिली नाही. दररोज भरोसा सेलकडून ज्येष्ठ नागरिकांना मदतीचा हात दिला जात आहे. ‘भरोसा सेल तसेच ज्येष्ठ नागरिक कक्षाकडून शहरातील 136 ज्येष्ठ नागरिकांना मदत पोहोचविण्यात आली. त्यामुळे अनेकांनी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.

लॉकडाऊनमुळे नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने अनेकजण दुसऱ्या शहरात अडकून पडले आहेत. त्यामुळे घरातील जेष्ठ नागरिकांचा मदतीचा आधार नाहीसा झाला होता. मात्र, पोलिसांच्या भरोसा सेल आणि जेष्ठ नागरिक कक्षातून अनेकांना घरी जाऊन मदत केली जात आहे. रुग्णालयात जायचे आहे, गॅस संपला, जेवणाचा डबा तसेच औषधे हवी आहेत, किराणा माल, भाजी हवी असल्याची मदत ज्येष्ठ नागरिकांकडून पोलिसांकडे केली जात आहे.

त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना भरोसा कक्ष तसेच ज्येष्ठ नागरिक कक्षाकडून मदत उपलब्ध करून देण्यात येत आहे. टाळेबंदीच्या काळात त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून पोलीस शहरातील वेगवेगळ्या भागात काम करणाऱ्या 190 ज्येष्ठ नागरिक संघाच्या संपर्कात आहेत. शहरात एकटे राहणाऱ्या जयेष्ठ नागरिकांना मदत करण्यात येत असून सामाजिक संस्थांच्या सहकार्याने शहरातील तीन ते साडेतीन हजार ज्येष्ठ नागरिकांना अन्न, पाणी तसेच औषधांचे वाटप करण्यात येत आहे. पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम आणि अतिरिक्त आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, सहायक आयुक्त विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे, सहायक फौजदार अडसुळ, शिंदे, कांबळे, चाबुकस्वार, गायकवाड आदी ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य देत आहेत.

जेष्ठ नागरिकांनो तुम्हाला मदत हवी असल्यास इथे करा संपर्क

कोरोनामुळे शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंची मदत मिळवण्यासाठी ज्येष्ठ नागरिक कक्ष , हेल्पलाईन क्रमांक 1090 आणि 020-26111103 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.