रुग्ण घटल्याने 900 ठिकाणांची कचाटय़ातून सुटका, रुग्णवाढीचा दर 0.34 वरून 0.21 वर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत दिवाळीत काहीशी वाढलेली रुग्णसंख्या आता चांगलीच आटोक्यात आल्याने डिसेंबरमध्ये तब्बल 900 प्रतिबंधित क्षेत्रांची नियमांच्या कचाटय़ातून सुटका झाली आहे. तर रुग्णवाढीचा दरही झपाटय़ाने कमी होत असून 30 नोव्हेंबर रोजी 0.34 टक्के असणारी रुग्णवाढीची सरासरी आता 0.21 टक्क्यांवर आली आहे. यामध्ये दुपटीचा वेगही चांगलाच वाढला असून गेल्या 15 दिवसांतच 121 दिवसांनी वाढून 328 दिवसांवर गेला आहे.

गौरी-गणपतीच्या धर्तीवर ख्रिसमस, नववर्षासाठीही नियमावली!

नोव्हेंबर महिन्यात दिवाळीत झालेल्या गर्दीनंतर रुग्णसंख्या मोठय़ा प्रमाणात वाढेल अशी शक्यता होती. मात्र, कोरोनाचे रुग्ण वाढले नाहीत आणि दुसर्या लाटेची शक्यताही मावळली, स्थिती नियंत्रणात राहिली. 29 नोव्हेंबरपासून ते 18 डिसेंबरपर्यंत कोरोना रुग्णांची आकडेवारी हजार आत राहिली. मात्र, महिना संपायला आणखी 13 दिवस शिल्लक आहेत. डिसेंबरअखेरीला येणारा ख्रिसमस सण आणि नववर्षानिमित्ताने गर्दी होऊ शकते. त्या पार्श्वभूमीवर, खबरदारीचा उपाय म्हणून गौरी-गणपती, दिवाळी, छटपूजेच्या धर्तीवर ख्रिसमस आणि नववर्षानिमित्त लोकांनी गर्दी करू नये, यासाठी नियमावली तयार करून पालिका लोकांना आवाहन करणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

अशी झाली सुधारणा

30 नोव्हेंबर रोजी मुंबईत झोपडपट्टय़ा-चाळींतील पंटेनमेंट झोनची संख्या 434 होती. ती 17 डिसेंबर रोजी 372 झाली आहे. म्हणजेच गेल्या पंधरवडय़ात पंटेनमेंट झोनची संख्या 62 ने कमी झाली आहे.

30 नोव्हेंबर रोजी मुंबईतील सील इमारतींची संख्या 5 हजार 212  होती. ती 17 डिसेंबर रोजी 4404 झाली आहे. म्हणजेच सील इमारतींची संख्या 808 ने कमी झाली आहे.

सलग तीन आठवडे रुग्णसंख्या हजारच्या आत

कोरोना रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारने एकत्रितपणे राबवलेल्या विविध मोहिमांना यश येत असून मुंबईत गेले सलग तीन आठवडे रुग्णसंख्या हजारच्या आत आली आहे. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, कोरोना आटोक्यात असला तरी कोणतीही हयगय केली जाणार नाही, पालिका सतर्प असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले.