नियमांच्या कठोर अंमलबजावणीसाठी प्रत्येक प्रभागात पाच टीम तैनात! 24 पैकी 16 वॉर्डमध्ये रुग्णवाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालिकेच्या 24 पैकी तब्बल 16 वॉर्डमध्ये रुग्णवाढ होत असून मुंबईची रोजची रुग्णनोंद दोन हजारांपर्यंत होत आहे. शिवाय अत्यवस्थ रुग्णांची संख्या तीन दिवसांत 370 वरून 451 वर गेली आहे. त्यामुळे अलर्ट झालेल्या पालिकेकडून कोरोना खबरदारी नियमांच्या कठोर अंमलबजावणीसाठी प्रत्येक वॉर्डमध्ये कारवाईसाठी पथकांची संख्या दोनवरून पाचपर्यंत वाढविण्यात आली आहे. या पथकांकडून रेस्टॉरंट, हॉटेल, मॉल, लग्न सोहळे आणि कार्यक्रमांसह गर्दीच्या ठिकाणी धाडी टाकून कारवाई करण्यात येत आहे.

मुंबईत आटोक्यात आलेला कोरोना फेब्रुवारीच्या मध्यापासून पुन्हा वाढू लागला आहे. जानेवारीत 334 पर्यंत खाली आलेली दैनंदिन रुग्णसंख्या आता दोन हजारांपर्यंत वाढल्याने पालिकेने नियमांच्या कठोर अंमलबजावणीस सुरुवात केली आहे. मुंबईत सद्यस्थितीत मिळणाऱया बाधित रुग्णांमध्ये 90 टक्क्यांवर रुग्ण हे इमारती आणि उच्चभ्रू वस्तीमधील असल्याचे पालिकेच्या पाहणीत समोर आले आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, कार्यक्रम, नाईट क्लब आणि कार्यक्रमांमध्ये होणाऱया गर्दीमुळेच रुग्णवाढीला निमंत्रण मिळत असल्याने पालिकेने अशा ठिकाणी कारवाईला वेग देण्याचा निर्णय घेतला आहे.

मिनी कंटेन्मेंट झोनची कठोर अंमलबजावणी

सुरुवातीच्या काळात कंटेन्मेंट झोनची कठोर अंमलबजावणी केली जात होती. मात्र सद्यस्थितीत काही सूट देण्यात आली असली तरी मिनी कंटेन्मेंट संकल्पनेवर आधारित उपाययोजना करण्यात येत आहेत. यामध्ये प्रतिबंधित क्षेत्रातील सोसायटय़ांच्या पदाधिकाऱयांवर विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे. क्वारंटाइनचे नियम मोडणाऱयांची पालिकेकडे तक्रार करणे, स्क्रिनिंग, ऑक्सिजन पातळी मोजणे अशा उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत. शिवाय शक्य त्या ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्रात अत्यावश्यक जीवनावश्यक सेवा देण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत.

असे आहेत रुग्णवाढीचे प्रभाग

पूर्व उपनगरातील टी प्रभाग – मुलुंड, एन – घाटकोपर, एस – भांडुप, एम पश्चिम – चेंबूर, एम पूर्व-गोवंडी, मानखुर्द विभागात रुग्णवाढ होत आहे, तर पश्चिम उपनगरातील के पूर्व – अंधेरी पूर्व, के पश्चिम – अंधेरी पश्चिम, आर मध्य – बोरिवली, आर दक्षिण – कांदिवली, पी उत्तर – मालाड, डी – ग्र्रँट रोड भागात रुग्णवाढ अधिक आहे. शिवाय एफ उत्तर – माटुंगा,  एच पश्चिम – वांद्रे पश्चिम आणि जी उत्तर – दादर, धारावी भागातही रुग्णवाढ होत आहे.

कोरोना खबरदारी नियमांच्या कठोर अंमलबजावणीसाठी प्रत्येक प्रभागात पाच पथके तैनात आहेत. शिवाय मास्कशिवाय फिरणाऱयांवर कारवाई करण्यासाठी मार्शलची संख्या दुप्पट करून 100 करण्यात आली आहे. प्लॅटफॉर्मवरही कारवाई होत आहे. शिवाय लग्न सोहळे, कार्यक्रमांच्या बुकिंगची माहितीही पालिकेने घेतली आहे.

 सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त