शहांसारख्या नेत्यांमुळे कोरोनाचा फैलाव वाढला, शेतकरी नेते राकेश टिकैत यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी कोरोना फैलावावरून भाजप नेत्यांवर टीका केली. पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या बैठका झाल्या. शहांसारख्या नेत्यांमुळेच कोरोनाचा संसर्ग वाढला, असा आरोप टिकैत यांनी बुधवारी केला. शेतकरी कोणतीही मोठी सभा घेत नाहीत. कोरोना नियमावलीचे पालन करूनच आमचे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे आंदोलनातून कोरोना पसरण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असे ते म्हणाले.

टिकैत हे पश्चिम बंगालमध्ये असून बुधवारी त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी शेतकरी आंदोलन व शेतकऱयांच्या समस्यांबाबत चर्चा केली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना भाजपवर टीका केली. बंगालच्या निवडणुकीत केंद्र सरकार स्वतः प्रचाराच्या मैदानात उतरले होते. त्यावेळी कोरोनाचा फैलाव झाला नव्हता का? असा सवाल करीत टिकैत यांनी अमित शहा यांच्यासारख्या नेत्यांमुळेच कोरोना पसरल्याची टीका केली. सर्व विरोधी पक्षांनी शेतकऱयांसोबत यावे आणि कृषी कायदे रद्द करण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव टाकावा, असे आवाहनही त्यांनी केले.