
देशभरात कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. कोरोनाग्रस्ताशी संपर्क आलेल्या किंवा तशी लक्षणे दिसणाऱ्यांनी काहीही न लपवता सरकारी रुग्णालयात यावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र, कोरोना संशयित रुग्णाची माहिती देणं एका तरुणाच्या जीवावर बेतलं आहे.
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, बिहार येथील सीतामढी जिल्ह्यात कोरोना संशयित रुग्णाची माहिती देणाऱ्या तरुणाला जमावाने मारहाण केली आहे. ही घटना जिल्ह्यातील रुन्नीसैदरपूर येथे घडली. येथील एका गावात कोरोनाची चाचणी करून परतणाऱ्या संशयित रुग्णांनी काही साथीदारांसह गावातील बबलू नावाच्या तरुणाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत बबलूचा मृत्यू झाला.
Bihar: A man was beaten to death by 2 people, who had returned from Maharashtra, & their families y’day in Sitamarhi’s Madhaul village. The deceased had informed Corona help center about their return which had allegedly angered families of the 2 people.7 people have been arrested
— ANI (@ANI) March 31, 2020
बबलूने महाराष्ट्रातून बिहारमध्ये परतलेल्या दोन जणांविषयी गावच्या आरोग्य केंद्राला माहिती दिली होती. त्याला ते दोघेही कोरोनाचे संशयित रुग्ण असावेत अशी शंका आली होती. त्यानुसार त्याने शासकीय यंत्रणेला तशी माहिती दिली होती. या माहितीवरून या दोन जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले. मात्र, या चाचणीमुळे संतापलेल्या या दोन संशयित रुग्णांनी चाचणी झाल्यानंतर आपल्या कुटुंबातील पाच जणांसमवेत बबलू याला गाठलं आणि त्याला बेदम मारहाण केली. ही मारहाण वर्मी झाल्याने तरुणाचा मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे.

























































