‘ईएसडीएस’ कंपनीच्या सॉफ्टवेअरमुळे कोरोनाचे झटपट निदान; मोबाईल व्हॅन कार्यान्वित

1534

कोरोनासाठीच्या स्वॅब तपासणीला बराच वेळ आणि पैसे खर्च होत असून, यंत्रणेवरील ताण हलका करण्यासाठी नाशिकच्या ईएसडीएस कंपनीने आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगवर आधारित सॉफ्टवेअर तयार केले आहे. या ‘ए एप्लस कोविड-19 टेस्टिंग सोल्यूशन’च्या मदतीने एका मिनिटात चेस्ट एक्स-रे वरून निदान होते. नाशिकसह राज्यातील 50 खासगी रुग्णालयात याद्वारे दोन हजाराहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. कंपनीने नुकतीच ही सुविधा ठिकठिकाणी पोहोचावी म्हणून मोबाईल व्हॅनही कार्यान्वित केली आहे. या निदानात 96 टक्के अचूकता असल्याचा कंपनीचा दावा आहे.

सध्या कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच चालल्याने आरोग्य यंत्रणेवर तपासणीचा ताण अधिक आहे. त्यावर उपाय म्हणून ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्यूशन कंपनीचे अध्यक्ष पियूष सोमाणी यांच्या टीमने रेडिओलॉजिस्ट, डॉक्टर्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स तज्ञांच्या मदतीने हे सॉफ्टवेअर तयार केले आहे. त्यासाठी आठ हजाराहून अधिक रूग्णांच्या अहवालाचा अभ्यास करण्यात आला. या पद्धतीने स्पर्शरहीत व वेगवान निदान शक्य आहे. प्रतीतपासणी खर्च दीडशे रूपये असून हे सॉफ्टवेअर क्लाऊड बेस असल्याने अमर्यादित तपासणी करता येतील. त्यांनी शासनाला याची माहिती दिली असून, नाशिक महापालिकेला प्रात्यक्षिक सादर केले आहे. राज्यातील 50 खासगी रुग्णालयांमध्ये याचा वापर होत आहे, असे जनरल मॅनेजर विशाल जोशी यांनी सांगितले.

कंपनीने मोबाईल व्हॅनमध्ये ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याद्वारे सध्या त्यांच्या कर्मचाऱ्यांची तपासणी सुरू आहे. अनेक कॉर्पोरेट कंपन्यांनी या व्हॅनची मागणी केली आहे.

असे होते निदान

संबंधित पोर्टलवर लॉगइन केल्यानंतर रुग्णाच्या चेस्ट एक्स-रे ची सॉफ्टकॉपी अपलोड करून माहिती भरताच एका मिनिटात कोविडचे निदान होते. जसजशी जास्त संख्येने तपासणी होईल तसतसे हे सॉफ्टवेअर शंभर टक्के अचूकता गाठेल.

आपली प्रतिक्रिया द्या