कोरोनाची तिसरी लाट, पालकांनी विशेष खबरदारी घेतल्यास त्याचे अनुकरण करून मुले सुरक्षित राहतील

कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक असल्याची सर्वत्र चर्चा असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र ही तिसरी लाट कधी येणार, याचा कुणाला जास्त धोका आहे याबाबत ठोस कोणतीच माहिती नाही. त्यामुळे पालकांनी किंवा प्रौढांनी नुसती चर्चा न करता या तिसऱया लाटेपासून कसा बचाव करता येईल याचा विचार करावा, कोरोनाला दूर ठेवण्यासाठी विशेष खबरदारी घ्यावी, स्वच्छतेचे सर्व नियम पाळावेत. त्यामुळे लहान मुले सहजपणे त्याचे अनुकरण करून कोरोनाच्या तिसऱया लाटेपासून सुरक्षित राहतील, असा निष्कर्ष स्त्री आधार केंद्राच्या वतीने आयोजित केलेल्या परिसंवादात तज्ञांनी काढला आहे.

स्त्री आधार केंद्र, पुणे आणि महिला प्रबोधन व्यासपीठ, महाराष्ट्र यांच्या वतीने शनिवारी ‘कोविड ः काल, आज आणि उद्या’ यावर विशेष दृकश्राव्य कार्यक्रम आयोजित केला होता. कोरोना संकटकाळात बाधितांच्या समस्या सोडवण्याबरोबरच स्त्री आधार केंद्राचे दैनंदिन मदतकार्य अविरतपणे सुरू असल्याचे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱहे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले. कोरोना संकटात समाजात दोन मतप्रवाह दिसून आले. एक म्हणजे, आम्ही मास्क लावणार नाही, नियम पाळणार नाही म्हणणारा तर दुसरा, अमुक पदार्थ खाल्ल्याने कोणताच संसर्ग होत नाही असे म्हणणारा होता. पण लोकांनी आपला विवेक वापरून योग्य निर्णय घेणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोरोनाच्या तिसऱया लाटेमध्ये लहान मुलांना असलेल्या धोक्याबाबत पुण्यातील ससून रुग्णालयाच्या बालशल्यविशारद डॉ. मीनाक्षी नलबले-भोसले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ‘जम्बो कोविड सेंटरचे स्वरूप आणि आव्हाने’ या विषयावर बीकेसी जम्बो कोविड सेंटरचे प्रमुख डॉ. राजेश डेरे यांनीही मार्गदर्शन केले. तसेच कोरोनातून बरे झालेल्या अनेक नागरिकांनीही आपला अनुभव सांगितला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदिका उत्तरा मोने यांनी केले. संयोजन स्त्री आधार केंद्र व मिती क्रिएशन्स या संस्थांतर्फे करण्यात आले. हा कार्यक्रमस्त्री आधार केंद्र, पुणे आणि मिती ग्रुप या फेसबुक पेजेसवर, मिती ग्रुप डिजिटल या यूटय़ुब चॅनेलवरून प्रसारित करण्यात आला. शनिवार 26 जून रोजी या कार्यक्रमाच्या पुढील भागात रुग्णालयातील काळजी आणि सुरक्षितता या विषयावर परिसंवाद होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या