नव्या वर्षाच्या प्रारंभीपासून कोरोना लसीकरण, राज्य सरकारांनी कंबर कसली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विविध कंपन्यांनी कोरोना प्रतिबंधक लसी बनवल्या आहेत. अनेक रुग्णालयांमध्ये त्यांच्या मानवी चाचण्या सुरू आहेत. त्याचे सकारात्मक परिणामही दिसू लागले आहेत. आता केवळ केंद्र सरकारच्या परवानगीची प्रतीक्षा आहे. 2021 चा प्रारंभ कोरोना लसीकरणाने होण्याची शक्यता आहे. या लसीकरण मोहिमेसाठी राज्य सरकारांनी कंबर कसली आहे. उत्तर प्रदेश, तेलंगणात सरकारी कर्मचाऱयांच्या सुट्ट्या रद्द करून त्यांना लसीकरणाचे प्रशिक्षणही देण्यास सुरुवात झाली आहे.

उत्तर प्रदेशात कोरोना लसीकरण मोहिमेच्या कामासाठी सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱयांच्या मंजूर सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. उत्तर प्रदेशचे आरोग्य व कुटुंब कल्याण महासंचालक डॉ. राकेश दुबे यांनी तसे आदेशच आज जारी केले. त्याचे पालन न करणाऱया अधिकारी, कर्मचाऱयांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असेही त्यांनी बजावले आहे. डिसेंबरच्या अखेरीस किंवा जानेवारीच्या सुरुवातीलाच लसीकरणाला प्रारंभ करण्याची तयारी सुरू असल्याचे सांगितले जाते.

तेलंगणामध्ये मेगा लसीकरण मोहीमेसाठी सुविधा उभारल्या जात आहेत. लस साठवण्याठी शीतगृहे उभारली जात आहेत. कोरोना लसीचे डोस उपलब्ध झाल्यानंतर ते सुरुवातीला डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱयांना दिले जाणार आहेत. लसीकरणासाठी तेलंगणातील दहा हजार सरकारी अधिकारी व कर्मचाऱयांना प्रशिक्षण दिले जात आहे. त्यातील एकाने दिवसाला 100 जणांना लस दिली तर आठ-दहा दिवसांत 80 लाख नागरिकांचे लसीकरण होऊ शकेल असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. हे लसीकरण प्राथमिक आरोग्य केंद्रे, जिल्हा रुग्णालये आणि शिक्षण संस्थांमध्ये केले जाणार आहे.