
कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण वेगाने करण्यासाठी मुंबई महापालिकेने रहिवासी सोसायटी, मोठी गृहसंकुले आणि कार्यालयांमध्ये लसीकरणाला परवानगी दिल्यानंतर देवनारच्या ‘रहेजा एक्रोपोलीस’या सोसायटीमधील 600 जणांचे लसीकरण आज करण्यात आले. अशा प्रकारे लसीकरण करणारी मुंबईतील पहिली रहिवासी सोसायटी ठरली आहे. खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ झाला.
कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महापालिका अहोरात्र मेहनत घेत असून कोरोना चाचण्या आणि लसीकरणावर भर देण्यात येत आहे. त्यासाठी मुंबई महापालिकेने काही दिवसांपूर्वी खासगी कार्यालये, रहिवासी सोसायटय़ा आणि मोठी रहिवासी संकुले यांना खासगी रुग्णालयाच्या माध्यमातून लसीकरणाला परवानगी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर देवनारमधील ‘रहेजा एक्रोपोलीस’ या वसाहतीमध्ये ‘सुराना हॉस्पिटल’च्या सहाय्याने कोरोना लसीकरण मोहीम राबविण्यात आली. खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते आज त्याची सुरुवात झाली.
दक्षिण-मध्य मुंबईत राबविण्यात आलेली ही पहिली मोहीम आहे. यावेळी अप्पर पोलीस आयुक्त संजय दराडे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
घरकामगार, चालक, सुरक्षारक्षकांनाही लस
‘रहेजा एक्रोपोलीस’ सोसायटीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेत सोसायटीमधील राहिवाशांबरोबरच सोसायटीत घरकाम करणाऱया महिला, चालक, सुरक्षारक्षकांनाही कोविशिल्डचा पहिला डोस देण्यात आला. दरम्यान, लसीकरणानंतरही खबरदारी घ्यावी तसेच सरकारी नियमांचे काटेकोरपणे पालन करा, असे आवाहन राहुल शेवाळे यांनी केले.
परदेशी जाणाऱया विद्यार्थ्यांसाठी सोमवारपासून लसीकरण
45 वर्षे तसेच ज्येष्ठ आणि दिव्यांग व्यक्तींना आता घराजवळच्या लसीकरण केंद्रांवर नोंदणी न करता थेट जाऊन पहिला आणि दुसरा डोस घेता येणार आहे. त्याचबरोबर उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱया विद्यार्थ्यांसाठी सोमवारपासून कस्तुरबा, राजावाडी आणि कुपर रुग्णालयात थेट जाऊन लस घेता येणार आहे. लस घेताना विद्यार्थ्यांना परदेशी विद्यापीठ प्रवेश निश्चिती पत्र, परदेशी व्हिसा, व्हिसा मिळवण्यासाठी संबंधित विद्यापीठाकडून प्राप्त झालेले आय-20 किंवा डीएस-160 फॉर्म ही कागदपत्रे दाखवावी लागणार आहेत.

























































