कोपरगावमध्ये कोरोना लसीकरणाला सुरुवात

कोरोना लसीकरण मोहिमेला सोमवारी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात सुरुवात झाली. कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाच्या विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे यांना ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी लसीचा पहिला डोस देत लसीकरणाची सुरुवात केली.

डॉ. कृष्णा फुलसौंदर म्हणाले, संकटात आरोग्य यंत्रणेने बजावलेली भूमिका महत्त्वपूर्ण असून पहिल्या टप्प्यात “फ्रंटलाइन वर्कर’ असलेल्या तालुक्यातील सर्व डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येत आहे. दुसऱ्या टप्प्यात कोपरगाव तालुक्यातील अधिकारी व कर्मचारी यांना लस देण्यात येणार आहे. ग्रामिण रुग्णालय कोपरगाव येथे दररोज सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत लसीचे 100 डोस दिले जाणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.

लसीकरण नोंदणी,प्राथमिक तपासणी,प्रत्यक्ष लसीकरण, निरीक्षक कक्ष असे स्वतंत्र दालन करण्यात आले आहे. लस घेतलेल्या व्यक्तींना 30 मिनिटे निरीक्षण कक्षात देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. त्यानंतरही एखाद्याला काही त्रास जाणवू लागल्यास त्यांच्यासाठी अतिदक्षता विभागाची व्यवस्था करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.

पहिली लस घेण्याचा मान मिळालेल्या विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ.वैशाली बडदे लस घेतल्यानंतर म्हणाल्या की, कोरोना लस पूर्णपणे सुरक्षित आहे. त्याविषयी अफवा किंवा गैरसमज पसरु न देता आत्मविश्वासाने प्रत्येकाने लस घेणे गरजेचे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या