कोरोना लस टोचून घेणे ‘हराम’, मुसलमानांनी यापासून दूर रहावे! मौलवीचा फतवा जारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगभरात कोरोना व्हायरसचे थैमान सुरू असून बाधितांचा आकडा अडीच कोटींच्या जवळ पोहोचला आहे. या विषाणूला अटकाव घालण्यासाठी सर्वच देशातील शास्रज्ञ दिवसरात्र संशोधन करत आहेत. अनेक देशांमध्ये लसीच्या चाचण्या सुरू असून मानवजात याकडे मोठ्या आशेने डोळे लावून बसली आहे. याच दरम्यान एका मौलवीने फतवा जारी करत मुसलमानांनी लस टोचून घेऊ नये असे आवाहन केले आहे.

सुफयान खलीफा नावाच्या एका मौलवीने व्हिडीओ पोस्ट करून कोरोना विषाणूवरील लस टोचून न घेण्याचे आवाहन मुसलमानांना केले आहे. कोरोना लस हराम आहे, त्यामुळे मुसलमानांनी लस टोचून घेऊ नये. तसेच अन्य मुस्लिम संघटनांनी याविरोधात आवाज उठवला, असे आवाहन मौलवीने केले आहे.

ऑस्ट्रेलिया देशातील पर्थ शहरात हा मौलवी राहतो. त्याने मुसलमानांना कोरोना लसीचा विरोध करण्याचे आवाहन केले आहे. ‘डेली मेल’ने याबाबत वृत्त दिले आहे. मौलवीने कोरोना लसीचे समर्थन करणाऱ्या मुसलमान संघटनावर आगपाखड केली आहे. कोरोना लस योग्य आहे असे ज्या मुसलमान संस्थांना वाटते त्यांना लाज वाटायला हवी, असे हा मौलवी व्हिडिओत म्हणतो.

कॅथलिक ख्रिश्चन कोरोना लसी विरोधात उभे राहिले आहेत, कारण ते यास हराम मानतात. हे बेकायदेशीर आहे, असे मौलवी सुफयान खलीफा आपल्या व्हिडिओमध्ये म्हणतात. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियातील एका ख्रिश्चन धर्मगुरुने ऑक्सफर्ड विद्यापीठाने तयार केलेल्या लसीला विरोध केला होता. मात्र अनेक धर्माच्या नेत्यांनी यास समर्थन दिले आहे. मानव जातीला वाचवण्यासाठी बनवण्यात आलेली लस हारम कशी असेल? असा सवाल अनेक धर्म गुरूंनी केला आहे.