
कोरोनाच्या डेल्टा वेरियंट आणि डेल्टा प्लस वेरियंट या दोन्ही विषाणू प्रकारांनी सध्या देशासह जगभरात थैमान घातलं आहे. कोरोनाचं संक्रमण आटोक्यात यावं यासाठी लसीकरणाची मोहीम राबवण्यात येत असली तर आता येणाऱ्या एका बातमीमुळे चिंता वाढण्याची शक्यता आहे.
दिल्ली येथील एका रुग्णालयाने केलेल्या संशोधनात डेल्टा आणि डेल्टा प्लस या कोरोनाच्या दोन्ही वेरियंटवर लस आठ पट कमी प्रभाव पडत असल्याचं दिसून आलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूच्या डेल्टा वेरियंटला या आधीच धोकादायक असं म्हटलं होतं. रुग्णातील अँटिबॉडीजची संख्या घटवणे आणि विषाणूचा प्रभाव तीव्र करणे यामुळे डेल्टा अतिशय धोकादायक असल्याची माहिती संघटनेने दिली होती.
या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयासह अन्य तीन ठिकाणी शंभराहून अधिक आरोग्य सेवकांवर सर्वेक्षण केलं गेलं. केंब्रिज इन्स्टिट्यूट ऑफ थेराप्युटिक इम्युनोलॉजी अँड इन्फेक्शियस डिसीज या संस्थेनेही या संशोधन- सर्वेक्षणात सहभाग घेतला. त्यात असं आढळून आलं की, लसीचे दोन्ही डोस घेऊनही कोरोना संक्रमण झालेल्या अनेक आरोग्य सेवकांना डेल्टा वेरियंटची लागण झाली होती.
कोरोनाचा वारंवार संसर्ग होणं आणि त्याच्या संक्रमणाचा वाढलेला वेग याला डेल्टा वेरियंटच कारणीभूत ठरत असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. डेल्टा वेरियंटवर कोरोना लसीचा प्रभाव आठ पटींनी कमी होत असल्याचंही या अहवालात म्हटलं आहे.




























































