21 राज्यांत परिस्थिती सुधारतेय, दिल्ली, गुजरात आणि उत्तर प्रदेशचा समावेश

393

हिंदुस्थानात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच देशभरातील 21 राज्यांत दिलासादायक चित्र आढळून आले आहे. देशाच्या तुलनेत 21 राज्यांत कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केली आहे. या 21 राज्यांमध्ये दिल्ली, गुजरात आणि उत्तर प्रदेशचा समावेश आहे. देशात हे प्रमाण 60.77 इतके नोंदविण्यात आले आहे. देशभरात आतापर्यंत एकूण 6.73 लाख इतके कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून 19 हजार 268 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

हिंदुस्थानमध्ये कोरोनाचा प्रभाव दिवसागणिक वाढत चालला आहे. परंतु केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून वरण्यात आलेल्या उपाययोजना लक्षात घेता वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहेत. यामुळेच आतापर्यंत एकूण 4 लाख 9 हजार 82 रुग्णांना उपचार वरून बरे झाल्यानंतर घरी सोडून देण्यात आले आहे. तर सध्या देशभरात एकूण 2 लाख 44 हजार 814 रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. बरे होणाऱया रुग्णांची संख्यादेखील दिवसागणिक वाढत चालली आहे. रविवारी 1 लाख 64 हजार 268 जणांना घरी सोडून देण्यात आले आहे. तर गेल्या 24 तासांत देशात 14 हजार 856 बरे झाले आहेत. या आकडेवारीनुसार देशभरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 60.77 टक्के इतके आहे. पण हिंदुस्थानातील 21 राज्यांमध्ये हे प्रमाण अधिक असल्याचे आरोग्य मंत्रालयातर्फे सांगण्यात आले आहे.

– या 21 राज्यांमध्ये चंदिगड (85.9), लडाख (82.2), उत्तराखंड (80.9), छत्तीसगड (80.6), राजस्थान (80.1), मिझारोम (79.3), त्रिपुरा (77.7), मध्य प्रदेश (76.9), झारखंड (74.3), बिहार (74.2), हरियाणा (74.1), गुजरात (71.9), पंजाब (70.5), दिल्ली (70.2), मेघालय (69.4), ओडिशा (69.0), उत्तर प्रदेश (68.4), हिमाचल प्रदेश (67.3), पश्चिम बंगाल (66.7), आसाम (62.4)आणि जम्मू काश्मीर (62.4) या राज्यांचा समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या