वेब न्यूज – कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी ऍपल आणि गुगल येणार एकत्र

1665

सध्या जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. संपूर्ण जगच जणू बंद अवस्थेत गेल्यासारखे झाले आहे, दैनंदिन व्यवहारच ठप्प झाले आहेत. जगात धुमाकूळ घालणाऱया या कोरोना व्हायरसच्या प्रसाराचा मागोवा घेण्यासाठी आणि तो थांबवण्यास मदत करण्यासाठी आता ऍपल आणि गुगल या टेक क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांनी हातात हात मिळवले आहेत. नुकत्याच झालेल्या एका संयुक्त पत्रकार परिषदेत त्याची घोषणा करण्यात आली. कोरोना व्हायरसच्या प्रसाराचा वेध घेण्यासाठी ऍपल आणि गुगल या दोन्ही कंपन्या मिळून लवकरच एका अशा टूलची निर्मिती करत आहेत, की त्या टूलच्या मदतीने आरोग्य अधिकारीच नाही, तर सामान्य लोकदेखील या कोरोना व्हायरसचा माग काढू शकतील. सध्या या टूलच्या कार्यपद्धतीविषयी सविस्तर माहिती मिळालेली नसली, तरी हे टूल स्मार्टफोनच्या ब्लू टूथच्या मदतीने आपले काम करणार असल्याचे समजते. या ब्लू टूथच्या माध्यमातूनच मिळणाऱया डाटाच्या मदतीने कोरोना व्हायरसचा माग काढण्यात येणार आहे. आशा आहे की जगातील देशांना कोरोना व्हायरस अर्थात कोव्हिड -19 चा प्रसार कमी करण्यात मदत करण्यासाठी आणि दैनंदिन जनजीवन पुन्हा सुरळीत होण्यास मदत करण्यासाठी या नव्या तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याने बहुमूल्य अशी मदत होईल असे या दोन्ही कंपन्यांच्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे. ऍपल आणि गुगल या दोन कंपन्यांनी निर्माण केलेल्या मोबाइल ऑपरेटिंग सिस्टिमचे संपूर्ण युरोप आणि अमेरिकेतील मोबाइलवर वर्चस्व आहे. त्यामुळेच कोरोना व्हायरसविरुद्धच्या या लढाईत या दोन्ही कंपन्यांनीदेखील मैदानात उतरून शक्य ती सर्व मदत करावी असे आवाहन जगभरातून कोरोना व्हायरसविरुद्ध लढणारे शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ पहिल्यापासूनच करत आले होते. त्यांच्या या आवाहनाला आता अपेक्षित प्रतिसाद मिळाला आहे. हे तंत्रज्ञान खरेच बहुमूल्य ठरावे आणि सर्व जगाची घडी व्यवस्थित बसावी अशीच आता सर्वांची प्रार्थना असेल.

आपली प्रतिक्रिया द्या