corona virus 6 तासात होऊ शकते निदान, हिंदुस्थानातील महिला संशोधकांचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या संकटाशी संपूर्ण जग झुंजतं आहे. अजूनही या आजारातून बरं करण्यासाठी आणि तो होऊ नये यासाठी लस विकसित झालेली नाही. यामुळे या आजारापासून बचाव हाच सर्वोत्तम उपाय असल्याचं डॉक्टर आणि तज्ज्ञ मंडळी वारंवार सांगत आहे. विदेश प्रवासाचा इतिहास असलेल्या तसंच त्यांच्या संपर्कात आलेल्यांना कोरोनाची लागण झाल्याचे हिंदुस्थानात पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रुग्णाला कोरोनाची लागण झाली आहे की नाही याची चाचणी आणि त्याचा अहवाल यायला साधारण एक दिवस जातो. मात्र वाराणसीतील बनारस हिंदू विद्यापीठाच्या प्राध्यापकांनी आणि विद्यार्थ्यांनी असे तंत्र विकसित केले आहे ज्यामुळे कोरोनाची लागण झाली आहे अथवा नाही हे अवघ्या 4 ते 6 तासात कळू शकेल.

बनारस हिंदू वद्यापीठातील डॉ.गीता राय आणि त्यांच्या विद्यार्थिनी डॉली दास, प्रिया आणि हिरल ठक्कर यांनी हे तंत्र विकसित केल्याचं म्हटलं आहे. डॉ.राय यांच्या मते सध्या ज्या चाचणीपद्धती वापरल्या जात आहेत त्याने कोरोनाचे अचूक निदान होत नाही. कोरोनाशिवाय ज्या इतर संसर्गजन्य रोगांची लागण झाली आहे त्याचं निदान करूनही कोरोनाची लागण झाल्याचा निष्कर्ष या चाचण्यांमधून येऊ शकतो, कारण या चाचण्यांसाठीची किट ही फक्त कोरोनासाठी बनवण्यात आलेली नाहीत. राय यांनी म्हटले आहे की त्यांनी जे तंत्र विकसित केलं आहे ते फक्त कोरोनाच्या प्रथिन सूत्रांवर लक्ष केंद्रीत करून अचूक निष्कर्ष देतं. बाजारात फक्त कोरोनाची चाचणी करणारे एकही किट उपलब्ध नसल्याने हे नवं तंत्रज्ञान विकसित करावं असं आपल्या चमूला सुचल्याचं त्यांनी सांगितलं.

हिंदुस्थानच्या वैद्यकीय संशोधन परिषदेने कोरोनाच्या चाचणीची किंमत 4 हजार रुपये इतकी निश्चित केली आहे. डॉ.राय यांनी म्हटलंय की त्यांच्या तंत्राच्या आधारे ही चाचणी आणखी स्वस्त दरात होऊ शकेल. तसेच त्यांनी हा देखील दावा केला आहे की या चाचणीचा अहवाल अवघ्या 4 ते 6 तासात मिळू शकेल. अहवाल लवकर मिळाल्यास रुग्णावर वेगाने उपचार करणं शक्य होऊ शकेल. त्यांनी विकसित केलेल्या तंत्राच्या आधारे अजून कोणाचीही चाचणी घेण्यात आलेली नाहीये. त्यांचे तंत्र मान्यतेसाठी इंडीयन इन्स्टीट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीकडे पाठवण्यात आलं आहे. सध्या केंद्र सरकारची हीच संस्था अशा चाचणी किटना मान्यता देते. ही मान्यता मिळाल्यानंतर हे किट किती अचूक निदान करते हे कळू शकेल.