कर्मचाऱ्यांची हजेरी मस्टरवरच! पालिकेचा निर्णय

482

कोरोनाचा संसर्ग कमी होईपर्यंत मुंबई महानगरपालिकेतील सर्व कामगार, कर्मचारी आणि अधिकारी यांनी मस्टरवरच हजेरी लावावी. मात्र, पालिका रुग्णालयांमध्ये कार्यरत असलेल्या सर्व कर्मचाऱयांना बायोमेट्रिक हजेरी लावणे बंधनकारक आहे, असे पालिका प्रशासनाने आज स्पष्ट केले. कर्मचाऱयांच्या 100 टक्के उपस्थितीवरही मात्र पालिका प्रशासन ठाम आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, संसर्ग टाळण्यासाठी मार्च महिन्यांत मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचार्यांची बायोमेट्रिक हजेरी बंद करून ती मस्टरवर सुरू करण्यात आली. मात्र, 6 जुलैपासून पुन्हा बायोमेट्रिक हजेरी पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे परिपत्रक पालिकेने काढले. त्याला सर्व कामगार-कर्मचारी संघटनांनी विरोध केला होता. त्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त आणि कर्मचारी-कामगार समन्वय समितीचीही बैठक झाली. या बैठकीत बायोमेट्रिकचा निर्णय मागे घेण्याबाबत सहमती झाली. त्याबाबत आज पालिकेने परिपत्रक काढून सरसकट बायोमेट्रिक हजेरीचा निर्णय मागे घेत केवळ पालिका रुग्णालयांतील कर्मचाऱयांसाठी बायोमेट्रिक बंधनकारक केले आहे.

कर्मचाऱयांची एकदाच वैद्यकीय तपासणी
पालिका रुग्णालये किंवा दवाखान्यातून कोरोनामुक्त झालेल्या पालिका कर्मचाऱयांना रुग्ण बरा झाल्याचे प्रमाणपत्र दिले जाते. मात्र, कामावर हजर होण्यासाठी पालिका प्रशासन कोरोनामुक्त झालेल्या कर्मचाऱयाला पुन्हा वैद्यकीय तपासणी करायला लावते. मात्र, आता अशी तपासणी न करता कर्मचाऱयांना थेट कामावर रुजू होता येणार आहे.

कामगार संघटनांची आज बैठक
रुग्णालये आणि आरोग्य खात्यातील कर्मचाऱयांना कोरोनाचा धोका जास्त असतो. त्यामुळे बायोमेट्रिक हजेरी बंद करून त्यांचीही हजेरी मस्टरवर करावी, या मागणीसाठी सर्व कामगार-कर्मचारी संघटनांची उद्या, बुधवार, 8 जुलैला बैठक होणार आहे. पालिकेच्या या निर्णयाविरोधात कामगार संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या