
कोरोना व लॉक डाऊनमुळे यावर्षी पेण तालुक्यातील गणेश मूर्तिकारांना सुमारे 50 कोटींचा फटका बसला आहे. दरवर्षी पेण तालुक्यातून सुमारे 150 कोटी रुपयांच्या गणेशमूर्ती संपूर्ण देशासह विदेशातही पाठवण्यात येतात. परंतु या वर्षी मात्र सुमारे 100 कोटींचा व्यवसाय झाल्याने गणेश उद्योगाला 50 कोटींचा फटका बसला आहे.
कोरोनाच्या भीतीने विक्री कमी
दरवर्षी महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमधील व्यापारी पेण तालुक्यातून होलसेलमध्ये गणेश मुर्ती नेऊन त्यांची विक्री करतात परंतु या वर्षी मात्र कोरोनाच्या संकटामुळे अनेक ठिकाणी रेड झोन असल्याने व्यापाऱ्यांनी कमी प्रमाणात गणेश मूर्तींची खरेदी केली. मुंबई,पुणे,नाशिक,नागपूर, नगर, ठाणे, डोंबिवली, कल्याण, संभाजीनगर यांसह इतर शहरांमध्ये सुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने तेथे मंडप टाकून गणेशमुर्ती विक्री करण्याकरिता परवानगी नसल्याने याचा परिणाम विक्रीवर झाला आहे अशी माहिती गणेश मूर्ती व व्यावसायिक कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत देवधर यांनी दिली.
लॉकडाऊन मुळे निर्यात न झाल्याने दीड ते दोन कोटी रुपयांचा फटका
दरवर्षी पेण तालुक्यातून लंडन, ऑस्ट्रेलिया, थिवी, अमेरिका, दुबई, थायलंड, इंडोनेशिया, मॉरिशससह अनेक देशांना बाप्पाची वारी होते. पेण तालुक्यातून दरवर्षी सुमारे 1लाखाहुन अधिक गणेशमुर्त्या फॉरेनला जातात. लंडन,ऑस्ट्रेलियन, थिवी व अमेरिका येथे बाप्पाच्या मुर्त्या कंटेनर मधून समुद्रमार्ग जहाजाने पाठवण्यात येतात व या प्रवासाला 45 ते 50 दिवस लागतात. परंतु यावर्षी लॉक डाऊन मिळे या देशांना बाप्पा ची वारी होऊ शकली नाही. यावर्षी सुमारे 25 हजार गणेशमूर्तींचीच वारी फॉरेनला झाली आहे परंतु सुमारे 70 ते 75 हजार गणेशमूर्तींची निर्यात न झाल्याने या व्यवसायाला दीड ते दोन कोटी रुपयांचा फटका बसला आहे.
रेल्वेबंद असल्याने 1 लाख गणेशमूर्ती कोकणात गेल्याच नाहीत
दरवर्षी मुंबईतील चाकरमानी उत्सवाकरिता कोकणात आपल्या घरी जाताना पेण येथून सुबक सुंदर बाप्पांच्या मूर्ती रेल्वेद्वारे घेऊन जाताात परंतु यावर्षी रेल्वे बंद असल्याने त्याच प्रमाणे गणेशभक्तांना 10 दिवस कोरेनटाइनचे आदेश असल्याने हजारो गणेशभक्तांनी कोकणवारी न करण्याचा निर्णय घेतल्याने यावर्षी सुमारे 1 लाख गणेशमुर्त्या कोकणात गेल्याच नाहीत. व खाजगी गाडीने गणेशमूर्ती कोकणात घेऊन जाणे परवडत नसल्याने गणेशमूर्ती विक्रीवर परिणाम झाला आहे अशी माहिती गणेश मूर्ती संघटनेचे उप खजिनदार निलेश समेळ यांनी दिली.
पीओपीच्या 5 लाख गणेशमूर्ती विक्री विना पडून
केंद्र सरकारच्या पीओपीच्या गणपतीमूर्ती वर घातलेल्या बंदीनंतर ग्राहकांनीही पीओपीच्या गणेशमूर्तींकडे पाठ फिरवली आहे. यानंतर केंद्र शासनाने पीओपीच्या गणेशमूर्तींना विक्रीकरिता हिरवा कंदील दाखवला असला तरी ग्राहकांनी मात्र शाडू मातीच्या लहान आकाराच्या गणेशमूर्तींना पसंती दिली आहे त्यामुळे एकट्या पेण तालुक्यात सुमारे पाच लाख पीओपीच्या गणेशमूर्ती विक्री विना पडून आहेत.
शाडू मातीच्या ईकोफ्रेंडली गणेशमूर्तीना अधिक मागणी
गणेश भक्तांही पर्यावरण संवर्धनासाठी तयार असुन शाडू मातीच्या व नैसर्गिक रंगांपासुन तयार करण्यात आलेल्या गणेशमुर्तीना चांगलीच मागणी वाढली आहे. विसर्जना नंतर सदरच्या बाप्पाच्या मुर्ती पाण्यात सहजपणे विरघळून जातात पर्यावरणाला मारक ठरत नाही त्यामुळे गणेशभक्त ईकोफ्रेंडली गणेशमूर्तीना प्राधान्य देत आहेत. गणेश भक्त शाडू मातीच्या ईकोफ्रेंडली गणेशमूर्तींचीच मागणी करीत आहेत.



























































