कौतुकास्पद! खाऊसाठी जमवलेले पैसे चिमुरड्याने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिले

1878

पालक त्यांच्या मुलांना जमेल तसे खाऊसाठी पैसे देत असतात, काही मुलं हे पैसे साठवून ठेवत असतात. हिंगोलीच्या नीलहर्ष अगस्तीलाही ही सवय होती. 5 वर्षांच्या या चिमुरड्याला त्याच्या वयाच्या मानाने बरीच सामाजिक जाण आहे. यामुळे त्याने राज्यावर, देशावर आलेलं गंभीर संकट ओळखून खाऊसाठी जमवलेली सगळी रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिली आहे. ही रक्कम देण्यासाठी जेव्हा त्याने पिगी बँक फोडली तेव्हा त्यातून 2700 रुपये जमा झाले.

नीलहर्षने जेव्हा पिगी बँकमधली रक्कम कोरोनाविरूद्धच्या लढासाठी द्यायची ठरवली तेव्हा त्याच्या वडिलांना खूप आनंद झाला. शिवसैनिक असलेल्या अनिल अगस्ती यांनी नीलहर्षसह सेनगावचे तहसीलदार कार्यालय गाठले. नीलहर्षच्या निर्णयाबद्दल जेव्हा तहसीलदार जीवनकुमार कांबळे यांना कळाले तेव्हा त्यांनीही त्याचे खूप कौतुक केले. नीलहर्षने ही रक्कम त्यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी केशवराव अगस्ती, अनिल अगस्ती, शैलेश तोष्णीवाल, लक्ष्मण गडदे हे उपस्थित होते. नीलहर्ष हा वर्षभरापासून आई, वडील व आजोबांनी दिलेले पैसे जमा करत होता.

शेतकऱ्याचीही मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत
खासगी, सरकारी कर्मचारी त्यांना जमेल तशी पगारातील काही रक्कम ही वेगळी काढून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला किंवा पंतप्रधान सहाय्यता निधीला देत आहेत. शेतकरीही यात मागे नाहीये. हिंगोली तालुक्यातील लासीना येथील शेतकरी पवन जाधव हे दुग्धव्यवसाय करतात. दुग्धव्यवसायातुन दर महिन्याला त्यांना 30 हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. कर्मचाऱ्यांना त्यांचा एक महिन्याचा पगार सहाय्यता निधीला देताना पाहून जाधव यांनीही त्यांची एक महिन्याची मिळकत ही मुख्यमंत्री सहायता निधीला जमा करण्याचे ठरवले. त्यांनी ही रक्कम ताबडतोब ऑनलाईन पद्धतीने सहाय्यता निधीच्या बँक खात्यात जमा केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या