
विविध प्रकारच्या विषाणूंची तपासणी करणारी अत्याधुनिक प्रयोगशाळा सोमवारपासून संभाजीनगरात सुरू होणार आहे. ही प्रयोगशाळा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय घाटी येथे कार्यान्वित होणार आहे. या प्रयोगशाळेमध्ये घशातील द्रव्याची चाचणी म्हणजेच स्वॅब टेस्टचा अहवाल एका दिवसात मिळू शकतो. ही माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे यांनी दिली. 23 मार्च रोजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबई येथील पत्रकार परिषदेत राज्यात नवीन सात अत्याधुनिक प्रयोगशाळा सुरू करण्याची घोषणा केली होती यात मुंबईसह संभाजीनगरचाही समावेश होता.
संभाजीनगरातील प्रयोगशाळेसाठी पुणे येथील एनआयव्हीच्या वतीने आवश्यक असणारी तपासणी किट उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ही सामग्री शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल होत आहे. या किटविषयीची कायदेशीर पूर्तता आणि परवानग्या मिळल्यानंतर सोमवारपासून ही प्रयोगशाळा सुरू होऊ शकेल. कोरोनाच्या स्वॅबचा अहवाल मिळण्यासाठी तीन दिवस लागतात. ही प्रयोगशाळा सुरू झाल्यास अवघ्या एका दिवसात हा अहवाल मिळू शकेल आणि बाधित रुग्णांवर तातडीने उपचार करणे शक्य होतील. सध्या या प्रयोगशाळेसाठी क्षयरोग विभागाच्या लॅबची जागा तात्पपुरती उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रयोगशाळेत सुक्ष्मजीवशास्त्र विभागाचे तज्ज्ञ कोरोना विषाणू संदर्भातील चाचण्या करतील आणि अहवाल तयार करून देतील. या प्रयोगशाळेत मराठवाड्यातील नमुने तपासले जाणार आहेत.

























































