परवानगी मिळाल्यास 20 एप्रिलनंतर फ्लिपकार्ट, अॅमेझॉन संपूर्ण सेवा बहाल करणार

728

कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा 20 एप्रिल रोजी आढावा घेतला जाणार आहे. हा आढावा घेतल्यानंतर जिथे कोरोनाचा जास्त प्रभाव नाही अशा भागांमध्ये संचारबंदीत काही प्रमाणात शिथीलता आणली जाणार आहे. केंद्र सरकारने हाही सूचनावली तयार केली आहे. या सूचनावलीमध्ये फ्लिपकार्ट, अॅमेझॉनसारख्या ई-कॉमर्स कंपन्या कोरोनाचा प्रादुर्भाव अत्यंत कमी असलेल्या भागात सेवा सुरू करू शकतात असं म्हटल्याचं कळतं आहे. मात्र या कंपन्या पूर्वीप्रमाणे ग्राहकांना सगळ्या वस्तू घरपोच करू शकतात का फक्त काही मोजक्या वस्तूंचाच पुरवठा करू शकतात हे कळू शकलेलं नाहीये.

ई-कॉमर्स कंपन्या सरकारकडून अधिक स्पष्टतेची वाट पाहात असून परवानगी मिळाल्यास पूर्वीप्रमाणे आपण सर्व सेवा बहाल करू असं या कंपन्यांकडून कळवण्यात आल्याचं एका हिंदी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातमीत म्हटलं आहे. देशातील लॉकडाऊन हा 3 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे.

केंद्र सरकारच्या सूचनावलीतील व्यावसायिक आणि खासगी कंपन्यांच्या बाबतीत म्हटलंय की ई-कॉमर्स कंपन्यांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली जाईल. सामान घरपोच पोहचवण्यासाटी वापरण्यात येणाऱ्या गाड्यांसाठी आवश्यक ती परवानगी असेल तरच वाहतुकीला परवानगी देण्यात येईल. मात्र कोणकोणत्या वस्तूंच्या वाहतुकीला परवानगी असेल हे मात्र नमूद करण्यात आलेलं नाहीये.

आपली प्रतिक्रिया द्या