बारवाल्यांनी खंब्याऐवजी आंबा विकायला सुरुवात केली, विक्रीतून नोकरदारवर्गाचीही साईड कमाई

श्रीरंग खरे

कोरोना व्हायरसच्या संकटामुळे देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या काळामध्ये मॉल आणि बार बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बार बंद असल्याने ऐरवी ग्राहकांना दारू पाजणारे बारमालक आता आंबे विकायला लागले आहेत. फक्त बारमालकच नाही तर आय.टी.क्षेत्रात काम करणारे, खाद्यपदार्थांचा स्टॉल चालवणारे, हॉटेलमालक हे देखील आंबाविक्रीकडे वळले आहेत. नोकरदार वर्गाने अधिकचे उत्पन्न मिळावं यासाठी हा मार्ग स्वीकारला आहे तर उद्योगधंदा करणाऱ्यांनी काहीतरी उत्पन्न मिळावं अथवा कामगारांना पगार देता यावा यासाठी आंबे विकायला सुरुवात केली आहे.

संचारबंदी आणि जमावबंदीच्या आदेशांमुळे अनेकांनी घराबाहेर पडणं जवळपास बंद केलं आहे. काही ठिकाणी बाजारपेठाही बंद झाल्या असल्याने आंब्याचा मोसम सुरू झाला तरी आंबे खाता येत नसल्याची अनेकांना खंत सतावत होती. कोकणातील आंबा उत्पादकांना लॉकडाऊनमुळे सुरुवातीला आंबे मुंबई, पुण्याला पाठवणं शक्य होत नव्हतं. कालांतराने परवानगी मिळाल्यानंतर आंब्याची वाहतूक व्हायला सुरुवात झाली.

मुंबईसारख्या शहरात आंबा विकणाऱ्यांची गिऱ्हाईकं ठरलेली असतात. मोठे शॉपिंगमॉल , स्टोअर्स ही त्यांची पहिली गिऱ्हाईकं असतात. वर्षानुवर्ष या विक्रेत्यांकडे जाऊन आणि पाहून आंबे घेणारी गिऱ्हाईकंही असतात. मात्र कोरोनामुळे ही सगळी गिऱ्हाईकं आपल्यापासून यंदाच्या वर्षी दुरावल्याचे आंबा उत्पादक शेतकरी असलेले नितीन जठार यांनी सांगितले. असं असलं तरी नव्या प्रकारची गिऱ्हाईके आपल्याला यंदाच्या वर्षी मिळाली असे जठार यांनी सांगितले. या गिऱ्हाईकांमध्ये बार मालक, हॉटेल मालक, आर्कीटेक्ट, आय.टी क्षेत्रात नोकरीला असलेले अशा अनेकांचा समावेश आहे. ही मंडळी आंबा उत्पादक शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर आंबे विकत घेऊन ते आपापल्या भागात विकतात. बार किंवा हॉटेल मालक त्यांच्या ओळखीतील लोकांना आणि गिऱ्हाईकांना आंबे विकतायत. कमी दरात घरपोच आंबा विकत मिळत असल्याने त्यांच्याकडून आंबे घेणाऱ्यांची संख्या वाढायला लागली आहे. ज्यांचा आंबे विकण्याचा यापूर्वी कोणताही अनुभव नव्हता आणि या वर्षीपासून आंबे विकायला सुरुवात केली अशी काही ग्राहकांची माहिती काढण्याचा प्रयत्न केला. यामध्ये कुर्ल्याला आय.टी क्षेत्रात काम करणारा तरूण, बोरिवलीमध्ये फूड स्टॉल चालवणाऱ्या मालकाचा, माटुंग्याला असलेल्या आर्किटेक्टचा, ठाण्याला असलेल्या एका हॉटेलमालकाचा आणि मीरा भाईंदर परिसरातील एका बार मालकाचा समावेश आहे. यातील बोरिवली इथे फूड स्टॉल चालवणाऱ्या अमित पुराणिक यांच्याशी आम्ही संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की सध्या लॉकडाऊनमुळे माझा स्टॉल बंद आहे.

यामुळे होणारं आर्थिक नुकसान काहीप्रमाणात भरून निघावं यासाठी मी आंबे विकायला सुरुवात केली. जे.बी.अॅग्रो कंपनीकडून त्यांना आंबे मिळत असून त्यांच्याकडचं फळ हे मोठं आणि चव चांगली असल्याचं आपल्याकडून आंबे घेतलेल्यांनी सांगितल्याचं पुराणिक यांनी सांगितले. किरकोळ प्रमाणात आंबे विकणाऱ्यांना 5 किंवा 6 डझनाच्या पेटीमागे 800 रुपयांची कमाई होत आहे. साधारणपणे 3 दिवसांत या विक्रेत्यांकडच्या 25 पेट्या विकल्या जातात. या हिशोबाने त्यांना 3 दिवसांत 20 हजार रुपयांची कमाई होत आहे. काहींनी आपल्या सोसायटीमधल्या सदस्यांकडून ऑर्डर घेऊन त्यांना पेट्या घरपोच केल्या. यातून थोडी कमाई झाल्याने त्यांनी आजूबाजूच्या सोसायट्यांमधील मित्रांना किंवा ओळखीच्यांना आंब्यांबद्दल सांगितलं, तिथेही ऑर्डर मिळाल्याने नोकरी करणाऱ्यांनी आंबे विकून एका महिन्यात एक लाखाचं उत्पन्न कमावलं आहे. बार आणि हॉटेलमालक दोन दिवसाआड 130 पेट्या भरलेल्या गाड्यांची मागणी करत आहेत. एका गाडीमागे त्यांना दीड लाख रुपयांचा नफा मिळत आहे. या नफ्यातून ते कामगारांचे पगार देत असल्याची माहिती मिळाली आहे. बार बंद असले तरी कामगारांना पगार हा द्यावाच लागतोय. तो पगार देता यावा यासाठी बारमालकांनी आंबे विकण्यास सुरुवात केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या