
कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमुळे रोजगार, उद्योगधंद्यावर विपरीत परिणाम झाला आहे. हातावर पोट असणाऱ्यांचे या लॉकडाऊनमुळे बरेच हाल झाले. सांगली जिल्ह्यातील इरळी गावातल्या एका सलूनचालकालाही याचा फटका बसला. नवनाथ उत्तम साळुंखे असं या सलून चालकाचे नाव असून त्यांनी चरितार्थासाठी इतर कोणताच मार्ग नसल्याने निराश होऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. स्वत: विष पिण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या 4 वर्षांच्या मुलालाही विष पाजलं होतं.
कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळीमध्ये साळुंखे यांचे सलूनचे दुकान आहे. साळुंखे दाम्पत्याला एक मुलगी आणि एक मुलगा आहे.सलून बंद असल्याने आणि चरितार्थासाठी इतर मार्ग नसल्याने आर्थिक विवंचनेत अडकलेल्या साळुंखे यांनी जीव द्यायचं ठरवलं होतं. त्यांनी आधी आपल्या मुलाला विष पाजलं आणि नंतर स्वत: विष प्यायले. काहीतरी गडबड असल्यचाचं कळताक्षणीच साळुंखे यांच्या पत्नीने आरडाओरडा करत शेजार पाजारच्यांना बोलावलं. साळुंखे आणि त्यांच्या मुलाला तातडीने उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.























































