मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पंतप्रधानांसमोर प्रभावी सादरीकरण

1314

कोरोना संकटकाळात लॉकडाऊनविषयी खूप बोललो, पण आज मला अनलॉकिंगविषयी बोलयायचे आहे, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘मिशन बिगिन अगेन’ मध्ये महाराष्ट्र कशी कशी  झेप घेत आहे. याबाबतचे प्रभावी सादरीकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये केले. यावेळी त्यांनी काही औषधांच्या उपचार पद्धतीस त्वरित मान्यता मिळावी तसेच शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्जपुरवठा करण्यासाठी निर्देश द्यावेत, परीक्षांसाठी देशभर एकच सूत्र हवे अशा मागण्याही केल्या.

कोरोना महामारीमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. चार लॉकडाऊननंतर केंद्र सरकारनं हळूहळू बंधन शिथिल करण्यास सुरूवात केली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी, गेल्या दोनअडीच महिन्यात महाराष्ट्राने मोठ्या प्रमाणावर आरोग्य सुविधा निर्माण केल्या आहेत. एकीकडे हा लढा सुरु असतांना मोठ्या गुंतवणूकदारांशी करार करून अर्थचक्र वेगाने फिरवायला सुरुवात करण्यात आल्याची माहिती दिली.

गुंतवणूक आणि उद्योगांना प्रोत्साहन

‘मिशन बिगीन अगेन’ मध्ये महाराष्ट्राने पुन्हा झेप घेण्यास सुरुवात केली आहे. वैश्विक महामारी कोरोनाचे संकट सुरु असतानादेखील महाराष्ट्राने नुकतेच १६ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार १२ मोठ्या कंपन्यांसमवेत केले. यामुळे १४ हजार लोकांना रोजगारही मिळणार आहे. या उद्योगांत चीन, अमेरीका, दक्षिण कोरिया, सिंगापूर, अशा देशांचा समावेश असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. लॉकडाऊन नंतर राज्यात ६० हजार लहान मोठे उद्योग सुरू झाले असून १५ लाख लोक कामावर येत आहेत.

चेस दि व्हायरसला प्राधान्य 

महाराष्ट्राने गेल्या काही दिवसांत राज्यभर सुमारे ३ लाख बेड्सची सुविधा निर्माण केली आहे तसेच फिल्ड हॉस्पिटल्स उभारले आहेत. बीकेसी मैदानावरील दुसऱ्या टप्प्यातील रुग्णालयाची तसेच नेसको येथील कोविड रुग्णालयाची छायाचित्रेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी पंतप्रधानांना दाखवली. चेस दि व्हायरसला संपूर्ण प्राधान्य दिले असून चाचण्या करणे आणि व्यक्तींचे संपर्क शोधणे वाढविले आहे. यामुळे धारावीसारख्या भागातही आम्ही संक्रमण रोखल्याचे त्यांनी सांगितले.

व्हेंटीलेटर्सची गरज

राज्याकडे पीपीई किट्स, एन ९५ मास्कची उपलब्धता आहे मात्र विशेषत: ग्रामीण भागासाठी व्हेंटिलेटर्सची गरज भासणार आहे. कोरोनाशी मुकाबला करतांना निश्चित उपचार नाहीत मात्र विविध औषधांचा समावेश असलेल्या उपचार पद्धती सकारात्मक परिणाम दाखवत आहेत, त्यामुळे त्यांना लवकरात लवकर मान्यता मिळावी. उपचारांमुळे ९० वर्षांची अनेक रोग असलेली वृद्ध महिलाही एकीकडे बरी होते आहे तर दुसरीकडे लहान मुलेही बरे होत असल्याचे त्यांनी सांगितले.

परीक्षांबाबत एकसमान निर्णय व्हावा

लगेचच परीक्षा घेण्याच्या स्थितीत आम्ही नाही आहोत. पदवीच्या अंतिम वर्षाला (अव्यावसायिक अभ्यासक्रम) असलेल्या विद्याथ्र्यांना गेल्या वर्षीच्या गुणांच्या आधारे गुण निश्चिती करण्याचा फॉम्र्युला राज्य सरकारने तयार करण्याचे ठरविले आहे. ज्या विद्याथ्र्यांना अशा रीतीने मिळालेल्या गुणांवर समाधान नसेल त्यांना अंतिम परीक्षा देण्याची संधीदेखील असेल अशी माहिती देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, केंद्राने व्यावसायिक आणि अव्यावसायिक परीक्षांच्या बाबतीत विविध केंद्रीय शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून एकसमान निर्णय घ्यावा जेणे करून सर्व विद्याथ्र्यांना एकच न्याय मिळेल, असे ते म्हणाले.

लोकलसेवा सुरू केल्याबद्दल धन्यवाद

अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व नोकरदारांसाठी आम्ही मुंबईतून लोकल सुरु करण्याची मागणी करीत होतो. ती मागणी आपण पूर्ण केली त्यासाठी धन्यवाद मानून मुख्यमंत्री म्हणाले की, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेला जुलैपासून पुढील ३ महिने कालावधी वाढवून मिळावा यामुळे रेशनकार्ड धारकांना लाभ मिळेल.

शहीद जवानांना श्रद्धांजली

व्हिडीओ कॉन्फरन्सच्या प्रारंभी पंतप्रधानांनी लडाख येथे धुमश्चक्रीच्या घटनेविषयी  माहिती दिली. व त्यानंतर सर्वांनी दोन मिनिटे स्तब्धता पळून श्रद्धांजली वाहिली. यावेळी बोलतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीमेबाहेरील संकटाचाही पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली समर्थपणे मुकाबला करू, असा विश्वास व्यक्त केला.

अर्थव्यवस्था धावू लागली

अनलॉक करताना अर्थव्यवस्था परत रुळावर आणायची आहे. मात्र हे करताना लोकांना सावधही ठेवावे लागेल. जगात कोरोनामुळे कसा हाहाकार उडाला हे आपल्याला माहीत आहे. त्यामुळे अनलॉक होत असताना याकडेही लक्ष द्यावे लागणार आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर अर्थव्यवस्था रुळावर येत आहे. मेच्या शेवटच्या सप्ताहात यात वेग दिसून आला. महागाईवरही नियंत्रण येत आहे. अर्थव्यवस्था आता वेगाने धावू लागली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या