
‘कोरोनाने तुम्हाला विळखा घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, तुम्ही सर्व शक्तीनिशी त्याचा मुकाबला करून त्याच्यावर मात केली. तुम्ही खरे योद्धा आहात. हीच पॉझिटिव्ह ऊर्जा घेऊन बाहेर पडा,’ अशा शब्दांत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी ‘एनएससीआय’मधून आज बाहेर पडलेल्या १३७ कोरोनामुक्त व्यक्तींचे कौतुक केले.
आदित्य ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी वरळीच्या नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया (‘एनएससीआय’) येथे उपस्थित राहून महापौर किशोरी पेडणेकर यांनीही सर्वांचे कौतुक केले. ‘नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया येथे उपचार घेत असलेल्या सर्वांवर पालिकेतर्फे योग्य उपचार करण्यात आले. यामध्ये आज कोरोनामुक्त होणाऱ्यांमध्ये जी/दक्षिण विभागातील ९५ जणांचाही समावेश आहे. कोरोनावर मात केलेल्यांमध्ये ८४ वर्षीय वृद्ध महिलेपासून ते दहा वर्षीय लहान बालकांपर्यंतचा समावेश आहे. घरी गेल्यावर १४ दिवस वेगळे राहा, कोणाच्या संपर्कात येऊ नका. घरीच राहून सुरक्षित रहा तसेच इतरांनाही सुरक्षित ठेवा असे आवाहन महापौरांनी यावेळी केले. यावेळी जी/दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे, पालिका आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले तसेच या ठिकाणी कार्यरत अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

























































