कोरोनाला घाबरायचं नाही, हरवायचं! वाकोल्याची 95 वर्षीय जिगरबाज आजी कोरोनाशी लढतेय

287

ज्येष्ठांना कोरोनाचा धोका जास्त असल्याचे सांगितले जात असताना वाकोल्यातील 95 वर्षीय आजीबाई कोरोना होऊनही ठणठणीत आहेत. त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. विशेष म्हणजे त्यांच्या कुटुंबातील तब्बल 9 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे सर्वजण कोविड सेंटर आणि रुग्णालयात उपचार घेत असताना यमुनाबाई मुणगेकर या घरात आपली सर्व कामे जबाबदारी आणि खबरदारी घेऊन निभावत आहे. ’कोरोनाला घाबरायचं नाही, हरवायचं!’ असे त्या आत्मविश्वासाने सांगत आहेत.

वाकोल्याच्या यशवंतनगरमध्ये यमुनाबाई मुणगेकर या आपल्या कुटुंबासोबत राहतात. दहा दिवसांपूर्वी त्यांच्या कुटुंबाच्या केलेल्या कोरोना चाचणीत तब्बल नऊ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे सर्वजण घाबरून गेले. मात्र यमुनाबाईंनी कुटुंबाला धीर दिला. सध्या कुटुंबातील इतर कोरोनाबाधितांवर पालिकेच्या सेव्हन हिल्स आणि बीकेसी येथील कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहे. या सर्वांची प्रकृतीदेखील उत्तम आहे. यमुनाबाई यांना दहा दिवसांनंतरही कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्याने त्या कोरोनामुक्त झाल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे केवळ रिपोर्ट पॉझिटिव्ह आला म्हणून घाबरून जाणाया ज्येष्ठांसाठी त्या आदर्श ठरत आहेत. यमुनाबाई यांना इतर कोणतेही आजारही नाहीत. यमुनाबाई या सुप्रसिद्ध भजनी बुवा श्रीधर मुणगेकर यांच्या मातोश्री आहेत. दरम्यान, वाकोला विभागात पालिका आणि विभागप्रमुख आमदार संजय पोतनीस यांच्या साहाय्याने नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळापासूनच शिवसेनेच्या माध्यमातून आरोग्य शिबिराचे आयोजन, गरजूंना धान्यवाटप, औषध वाटप असे उपक्रम आयोजित केले जात आहेत.

आपल्यासह कुटुंबाला कोरोना झाल्याचे समोर आल्यानंतर सुरुवातीला भीती वाटली. मात्र आम्ही सर्वांनीच कोरोनाला हरवण्याचा निर्धार केला आणि आम्ही सर्वजण कोरोनाला हरवणारच!- यमुनाबाई मुणगेकर, वाकोला

आपली प्रतिक्रिया द्या